Sanjay Rathod : क्लिनचीट मिळाली, आता मंत्रिमंडळात घ्या, संजय राठोडांसाठी महंतांचे एकनाथ शिंदे यांना साकडे; वनवास संपणार?
Sanjay Rathod : संजय राठोड याना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्या म्हणून बंजारा समाजातील काशी असलेल्या पोहरादेवी येथील महंतही राठोड यांच्यासाठी सरसावले होते.
यवतमाळ: पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या प्रकरणात 14 महिन्यानंतर क्लिनचीट मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोहरादेवीच्या महंतांनी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी केली. राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे राठोड यांचं पुनर्वसन करा. राज्याच्या मंत्रिमंडळात बंजारा समाजाचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे समाजाचा प्रतिनिधी घेऊन समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हातभार लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पोहरादेवींचे महंत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडेही ते हीच मागणी करणार आहेत. त्यामुळे आता राठोड यांना मुख्यमंत्री न्याय देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी पूजा चव्हाणसोबतच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. हाच मुद्दा करून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड हेच या आवाजतील व्यक्ती आहेत असा थेट आरोप केला होता. त्या आरोपानंतर संजय राठोड महिनाभर नॉट रिचेबल झाले होते. चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुण्याच्या वानवडी पोलिसात तक्रार सुद्धा देण्यात आली होती. या प्रकरणी पुण्याच्या वानवडी पोलिसांच्या पथकाने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चौकशी सुद्धा केली होती. या प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठात्याची साक्षही नोंदवण्यात आली होती. पूजा अरुण राठोड नावाने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची चौकशी सुद्धा करण्यात आली आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला होता.
राठोड पुन्हा सक्रिय
आरोपाॉनंतर संजय राठोड हे थेट आपल्या कुटुंबासह सामोरे आले होते. ते पोहरादेवी येथे येऊन मी निर्दोष आहे. या प्रकरणात माझा काही संबंध नाही. मला बदनाम केलं जात आहे, असं राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र कोरोना काळात झालेली पोहरदेची येथील गर्दी आणि विरोधकांचे मोठ्या प्रमाणात केलेले आरोप त्याना भोवले. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राठोड काहीसे विजनवासात होते. मात्र कालांतराने यांनी समाजाचा धागा पकडत राज्यभर बंजारा समाजाचे मेळावे घेतले. राज्यभर दौरे करत राज्यातील बहुसंख्य बंजारा समाजातील नेतृत्व असल्याचे चित्र उभे केले होते.
आंदोलनाचा इशारा
संजय राठोड याना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्या म्हणून बंजारा समाजातील काशी असलेल्या पोहरादेवी येथील महंतही राठोड यांच्यासाठी सरसावले होते. महंतांनी पोहरदेवी येथील यात्रेत धर्म परिषद घेत थेट ठराव मांडला होता. या महंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन राज्यातील भटका विमुक्त म्हणून असलेल्या बंजारा समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व द्या, अशी गळ घातली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. मात्र राठोड यांनी महंतांना विनंती करत आंदोलन पुढे ढकलायला सांगितलं होतं.
पूजाची हत्या नाहीच
त्यानंतर महंतांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे आपला मोर्चा वळवला होता. पूजा चव्हाण प्रकरणात काय तपास झाला याचा अहवाल देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुण्याच्या वानवडी पोलिसांनी काल पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसून अपघाती आहे. पूजाचा मृत्यू आत्महत्या असू शकते असा खुलासा केला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राठोड यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याची सरकारला विनंती केली आहे.
सत्याचा विजय होतोच
या प्रकरणात झालेल्या आरोपामुळे मी आणि माझे कुटुंब खूप व्यथित झालो होतो. न्यायासाठी मी स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या वादात माझा बळीचा बकरा दिला. शेवटी सत्यमेव जयते असतेच. सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली आहे.