‘मी उद्या पर्दाफाश करणार’, भाजपचे बडे नेते प्रवीण दरेकर यांचा मोठा इशारा, काय घडतंय?
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठा इशारा दिला आहे. विरोधकांकडून खोटा नरेटीव्ह कसा सेट केला जातो, याचा आपण उद्या पर्दाफाश करणार आहोत, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठा इशारा दिला आहे. “राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल देण्यास सुरुवात केली आहे. फेक नरेटीव्ह कसा सेट केला जातो, त्याचा पर्दाफाश मी उद्या करणार आहे”, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे दरेकर आता नेमका काय पर्दाफाश करतात? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. “सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सहमत आहे. पण ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या, या मागणीसोबत कुणीही राजकीय पक्ष सहमत नाही. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे का? याबाबत भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस, उद्धव ठाकरे किंवा मविआने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे यांनी करावी” असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
“शरद पवार बोलत आहेत की, ओबीसींसाठी काम करणारे लक्ष्मण हाके आणि मराठा नेते मनोज जरांगे यांना घेऊन बैठक करावी. अशा बैठकीसाठी कुणीही विरोध करत नाही. जरांगे बोलतात, आम्ही बैठकीत येऊन काय करणार? एका व्यासपीठावर सर्वांनी येण्याची गरज आहे. यामुळे महाराष्ट्रासमोर स्पष्ट भूमिका येईल”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
‘निवडणूक पाहून भूमिका घ्यायची नाही’
“शरद पवारांनी या बैठकीत उपस्थित राहून भूमिका मांडावी, असा आग्रह आहे. निवडणूक पाहून भूमिका घ्यायची नाही, असे चालणार नाही. एक गट ओबीसी तर दुसरा गट मराठा समाजाची बाजू घेत आहे. सरकार दोन्ही समाजाच्या बाजूने आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. आता झालेल्या भरतीत मराठा समाजाची मुले आलेली आहेत. दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे”, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
“सरकारमध्ये कुठलीही दोन मते नाहीत. विरोधी पक्ष हा दोन्ही समाजाच्या बाजूने दिसत नाही. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. जनतेची दिशाभूल थांबवली पाहिजे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे. सामाजिक तणाव आणि तेढ संपुष्टात आली पाहिजे”, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली.
भाजपने 288 जागा लढवाव्यात?
भाजप नेते नारायण राणे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व 288 जागा लढवाव्यात, असं आपल्याला वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यालादेखील प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्ही मात्र बोलले त्यावर भर देत नाही. मी ही पुनरुच्चार करतो. आम्ही सगळे महायुती म्हणून लढणार आहोत. नारायण राणे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की २८८ जागा लढण्याची क्षमता भाजपची आहे. पण याचा अर्थ २८८ उमेदवार भाजप उभे करत नाहीत. आम्ही महायुती म्हणून सामोरे जावू. महायुतीचा भगवा झेंडा विधानसभेत फडकवू”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.