पुणे विद्यापीठात राडा, प्रचंड तोडफोड, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील बैठक उधळून लावली
विद्यापीठात अश्लील गाणं चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आक्रमक आंदोलकांनी कुलगुरुंची बैठक उधळून लावली.
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिदषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या या राड्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. राड्यामुळे कुलगुरुंनाही बैठक थांबवावी लागली. तब्बल तासभर या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.
पुणे विद्यापीठात आज विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू होती. कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच अचानक घोषणाबाजीचा आवाज आला. काही कळायच्या आत अभाविपच्या कार्यकर्त्यांची झुंडच्या झुंड बैठकीच्या ठिकाणी शिरली. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता या आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजाच्या काचा फोडल्या. कागद फाडून तेही उधळले. ही तोडफोड करत असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत होते. अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली.
सुरक्षा रक्षक एकाच ठिकाणी
अभाविपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे सिनेट सदस्यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हे आंदोलक सिनेट सदस्यांचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहींनी तर बैठकीच्या ठिकाणीच ठिय्या मांडून जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. विशेष म्हणजे बैठकीच्या ठिकाणी पाच ते सहा सुरक्षा रक्षक होते. पण त्यांनी या आंदोलकांना अडवलं नाही. या सुरक्षा रक्षकांनी कुलगुरूंच्या भोवती कडं घातलं होतं.
तोडफोड केली नाही
विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण होतेच कसे? ज्यांनी हे गाणं चित्रीकरण करण्यास परवानगी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी यावेळी केली. आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहे. आम्ही कोणतीही तोडफोड केली नाही. अश्लील गाण्याचं चित्रीकरण झालं. त्यावर कारवाई झालेली नाही. कुलगुरू त्याच ठिकाणी बसले आहेत. पण कारवाई करत नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलन पुकारलं आहे, असं एका आंदोलकाने सांगितलं.
संध्याकाळपर्यंत अनुमान काढू
तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीची बैठक सुरू आहे. संध्याकाळपर्यंत ते काही अनुमान काढतील. आज पहिली बैठक आहे. एक दोन बैठकीनंतर कारवाईबाबतचा निर्णय होईल, असं कुलगुरुंनी सांगितलं.