पार्थ पवार यांची राजकीय एन्ट्री रखडली, अजितदादांनी कोणाला दिली पसंती
Pune ajit pawar and parth pawar News | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर पार्थ पवार यांची निवड होणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी पार्थ ऐवजी आपल्या विश्वासू व्यक्तीला संधी दिली आहे.
पुणे | 8 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांचे वर्चस्व होते. परंतु अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील जवळपास ४० आमदार आले. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. अजित पवार यांनी पक्षाची सूत्र आपल्या हातात घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तेव्हापासून बारामती लोकसभा मतदार संघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच पार्थ पवार यांची राजकारणा एन्ट्री सहकाराच्या माध्यमातून होणार असल्याचे म्हटले जात होते. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ यांची निवड होणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु अजित पवार यांनी घराणेशाही ऐवजी विश्वासू व्यक्तीला संचालक केले आहे.
कोणाला दिली संधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची बुधवारी नियुक्ती झाली. रणजित तावरे हे अजित पवार यांचे विश्वासातील आहे. पुणे जिल्ह्यातील मालेगाव बुद्रुक येथील ते रहिवाशी आहेत. जिल्हा बँकेच्या संचालकपदावर पार्थ पवार यांना पाठवण्याऐवजी रणजित तावरे यांची निवड अजित पवार यांनी केली. बुधवारी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तावरे यांच्या नावाचे सूचक बँकेचे चेअरमन दिंगबर दूर्गाडे होते तर दत्तामामा भरणे यांनी अनुमोदन दिले.
कोण आहेत रणजित तावरे
रणजित तावरे यांचे काका बाळासाहेब तावरे सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे १७ वर्ष ते अध्यक्ष होते. रणजित तावरे हे उद्योजक आहेत. टाटा कंपनीचे १५ शोरूम आणि पेट्रोल पंप त्यांचे आहेत. पुणे जिल्ह्यातील राजहंस दूध संस्थेचे चेअरमनही ते आहेत. अजित पवार यांचे विश्वासातील कार्यकर्ते ते आहेत. तावरे सहकाराच्या माध्यमातून राजकारणात आले आहे.