Darshana Pawar : एमपीएससी पास दर्शना पवार हिच्या हत्येनंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
MPSC Pass Darshana Pawar : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. गड, किल्ल्यांवर असे प्रकार होऊ नये, म्हणून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रदीप कापसे, पुणे : पुणे येथील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिची १८ जून रोजी हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिचा मित्र असलेला राहुल हंडोरे यानेच ही हत्या केली होती. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हत्या का केली? कशी केली? आदी माहिती जमवून भक्कम पुरावा पोलीस तयार करत आहेत. गुरुवारी त्याची पोलीस कोठडी संपली होती. परंतु पोलिसांनी न्यायालयाकडून पुन्हा पोलीस कोठडी मागून घेतली. न्यायालयानेही पोलिसांची मागणी मान्य करत त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. आता 3 जुलैपर्यंत राहुल हंडोरे याचा मुक्कम पोलीस कोठडीत असणार आहे. त्याचवेळी प्रशासनाने असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे.
काय घेतला निर्णय
दर्शना पवार हिच्या हत्येनंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दर्शनाची हत्या राजगड किल्ल्यावर झाली होती. ते ओळखून प्रशासनाने सिंहगडावर रात्रीच्या वेळी प्रवेश बंद केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी सिंहगडाजवळ असलेल्या कोंढणपूर येथे तपासणी नाका उभारला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रेमी युगलांना आता चाप बसणार आहे. तसेच गड अन् किल्ल्यांचे पावित्र्यही राखले जाणार आहे.
रात्रीही घालणार गस्त
प्रशासनाने फक्त रात्री प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला नाही तर गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा रक्षकांना चुकवून कोणी प्रवेश केल्यास मोठी कारवाई होणार आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी वनविभागाचे कर्मचारी घालणार गस्त घालणार आहे. त्यामुळे आता प्रेमी युगलांवर या ठिकाणी सतत वॉच असणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.
काय झाला होता प्रकार
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे दोघेही मित्र होते. त्यांची बालपणापासून ओळख होती. ते दोघे एमपीएससीची तयारी करत होते. परंतु दर्शना प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाली. राहुलला यश आलं नव्हते. तो दर्शनाच्या मागे लग्न करण्यासाठी लागला होता. परंतु दर्शनाने त्याला नकार दिला. त्यामुळे राहुल याने तिला राजगडावर नेले. त्याठिकाणी लग्नासंदर्भात स्पष्ट विचारणा केली. तिने नकार देताच आधी ब्लेडने वार केले त्यानंतर दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर राहुल फरार झाला.