जातपंचायतीने डॉक्टर कुटुंबियास काढले जातीबाहेर, मग डॉक्टरांच्या आईच्या निधनानंतरही नातेवाईक आले
राज्यातील जातपंचायत बरखास्त करण्यात आल्या. पण आजही जातपंचायतचा जाच सुरूच आहे. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या एका सुशिक्षित डॉक्टरच्या कुटुंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं प्रकरण समोर आलंय. यामुळे कायदा अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मनोज गाडेकर, श्रीरामपूर, अहमदनगर : आज जग एकविसव्या शतकात वाटचाल करत असताना काही समाज अजुनही आपल्या अनिष्ठ परंपरा सोडताना दिसत नाही. समाजाच्या कुप्रथेविरोधात समाजातील सुशिक्षीत तरुण-तरूणी पुढे येत आहेत. मात्र त्यांनाही बहिष्काराला सामोर जाव लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांने ऑक्टोंबर २०२२ मध्ये महाराष्ट्रामध्ये जात पंचायत भरवण्यात आता बंदी घातली. परंतु त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाही. आता नगर जिल्ह्यात जात पंचायतीने डॉक्टर कुटुंबियांना जातीबाहेर काढले आहे.
जातपंचायती सुरुच
राज्यातील वैदू समाज जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी मात्र आजही जातपंचायत सुरू आहेत. अन् जातपंचायतचा जाच सुरूच असल्याचं दिसतंय. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या एका सुशिक्षित डॉक्टरच्या कुटुंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचं समोर आलंय.
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे राहणारे डॉक्टर चंदन लोखंडे. गेल्या अनेक वर्षांपासून ते वैदू समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा, जातपंचायत विरोधात लढा देताहेत. समाजातील तरूणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजातील अस्पृश्यतेची दरी दूर करावी यासाठी काम करताहेत. चंदन लोखंडे यांनी जातपंचायत विरोधात सातत्याने लढा दिल्याने काही वर्षांपूर्वी जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णयही घ्यावा लागला होता. मात्र काही दिवसापूर्वी रंगपंचमीच्या दिवशी मढी येथे जातपंचायत पुन्हा भरली. या जात पंचायतीने चंदन लोखंडे यांच्या परिवारावर अघोषित बहिष्कार टाकलाय.
डॉक्टरांच्या आईचे निधन, कोणी आले नाही
जातपंचायतने लोखंडेच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याने काही दिवसापासून चंदन लोखंडे यांच्या कुटूंबाला कोणत्या कार्यक्रमात बोलावलं जात नाही तर त्यांच्या घरीही कोण जात नाही. पंधरा दिवसापूर्वी चंदन लोखंडे यांच्या आईचे निधन झाले. मात्र त्यांच्या सांत्वनाला किंवा दशक्रिया विधिलाही जातपंचायतच्या फतव्यामुळे नातेवाईकांना येता आले नाही, असे डॉ.चंदन लोखंडे यांनी सांगितले.
डॉ.चंदन लोखंडे सातत्याने समाजातील अनिष्ठ रूढींविरोधात लढत आहे. यामुळे जातपंचायतीच्या पंचांनी त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकलाय. वैदू समाजातील पंचांची मोठी दहशत असल्याने कायम भितीच्या सावटाखाली त्यांना राहाव लागत असल्याच चंदन यांची पत्नी पुजा लोखंडे यांनी म्हटलेय.
अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या रंजना गवांदे यांनी वैदू समाज जातपंचायत बंद व्हावी यासाठी मोठा लढा उभारला होता . यातून जातपंचायत विरोधी कायदाही अंमलात आला. जातपंचायतही रद्द करण्यात आली मात्र आता पुन्हा नव्याने जातपंचायत सुरू झाल्याने सरकार आणि पोलिसांनी यावर कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.