रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची घोषणा
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. Ajit Pawar
मुंबई : “पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. (Ajit Pawar announces Rs 5 lakh aid to relatives of pune fire mulashi uravade chemical company fire victims)
आग विझली असली तरी कूलिंग ऑपरेशन सुरू
मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.
…म्हणून आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत
जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून चौकशीचे आदेश दिलेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतलाय. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांना दुःख
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत काही निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवतो. तसेच कारखान्यातील इतर सर्व लोकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटलेय.
संबंधित बातम्या:
Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती
Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?
Pune Fire : पुण्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक कंपनीला आग, 15 महिलांसह 18 जणांचा मृत्यू