Police : कझाकिस्तानमधल्या स्पर्धेचा ‘आयर्न मॅन’; हिंजवडीच्या सहायक पोलीस निरीक्षकाची कमाल, कशी जिंकली स्पर्धा? वाचा…
सकाळचा जो वेळ मला मिळत होता, त्यावेळेत मी माझा छंद जोपासत होतो. हे सगळे करून नंतर ड्यूटीवर जात होतो, असेही राम गोमारे यांनी या खडतर प्रवासाबद्दल सांगितले.
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad) आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस स्थानकात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या राम गोमारे यांनी आयर्नमन किताब (Ironman kazakhstan) पटकावला आहे. कझाकिस्थानची राजधानी नूर सुल्तान इथे झालेल्या स्पर्धेत हे घवघवीत यश मिळवले आहे. अत्यंत खडतर असलेल्या या स्पर्धेत गोमारे यांनी 1 तास 36 मिनिटे स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग 5 तास 40 मिनिटे तर मॅरेथॉन रनिंग 4 तास 15 मिनिटे असे ऐकूण 11 तास 50 मिनिटात ही स्पर्ध पार केली. कोणतीही सुट्टी न घेता गेली वर्षभर सर्व करत त्यांनी हा किताब पटकावला आहे. 14 ऑगस्ट रोजी कझाकिस्तान येथे ही स्पर्धा पार पडली होती. 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग अशी ही स्पर्धा (Competition) होती. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
‘आणखी आव्हानात्मक स्पर्धांमध्ये भाग घेणार’
या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग हे 2 तास 20 मिनिटांमध्ये, 180 किलोमीटर सायकलिंग 8 तास 10 मिनिटांमध्ये तर 42 किलोमीटर रनिंग ही 6 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायची असते. हा सर्व प्रवास मी 11 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केला, असे राम गोमारे यांनी सांगितले. ही स्पर्धा जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे यानंतर यापेक्षा अधिक आव्हानात्मक तसेच खडतर स्पर्धांमध्ये भाग घेणार, असे त्यांनी सांगितले. तर मुंबई-पुणे किंवा पुणे-गोवा सायकलिंग स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशस्वीरित्या त्या पूर्ण करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काम करत जोपासला छंद
ही स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्या कझाकिस्तानच्या नूर सुल्तान या शहराचे आणि पुण्याचे तापमान यात खूप तफावत आहे. त्याठिकाणचे पाणी अत्यंत थंड असल्याने सात दिवस आधी तेथे जाऊन सरावाला सुरुवात केली आणि वातावरणाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. सकाळचा जो वेळ मला मिळत होता, त्यावेळेत मी माझा छंद जोपासत होतो. हे सगळे करून नंतर ड्यूटीवर जात होतो, असेही त्यांनी या खडतर प्रवासाबद्दल सांगितले.