शरद पवार म्हणाले, अजितदादा आमचेच नेते; बच्चू कडू म्हणतात; डोकं फुटायची वेळ येईल
प्रशासकीय सेवेतील 25 टक्के अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. 75 टक्के अधिकाऱ्यांना कोंडून ठेवून खुराक दिला दिला पाहिजे. ज्यांनी बोगस प्रमाणप्रत देऊन नोकरी मिळवली असेल त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून प्रशासनाचे पैसे वसूल केले पाहिजे.
कोल्हापूर | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते असल्याचा दावा केला आहे. शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने तर राष्ट्रवादीत फूट पडलीय असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे. तर, शरद पवार यांच्या विधानामुळे जनतेत संभ्रम होत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. हा प्रतिक्रियांचा धुरळा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी त्यात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी तर डोकं फुटायची वेळ येईल, असं विधानच केलं आहे.
बच्चू कडू हे कोल्हापुरात आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे थेट ऑलिम्पिकच असू शकेल. पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
सर्व्हे सर्व बोगस
लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेंवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व्हे सगळे बोगस असतात. 50 टक्के लोकं काहीच खरं सांगत नाहीत. राजकारण हे राजकारणाप्रमाणे करावं लागतं. संख्याबळाचा विचार करून रहावं लागतं. नको असलेल्या शक्ती देखील कधी कधी सोबत घ्याव्या लागतात, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांची तिसरी आघाडी हा सक्षम पर्याय होऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.
शेतकऱ्यांनो मतदानातून ताकद दाखवा
कांद्याच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. जे जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांना माझा इशारा आहे. शेतकऱ्यांनी मतदानातून आता आपली ताकद दाखवली पाहिजे. आघाडी सरकारवेळी अडचणी आणल्या, भाजप सरकार असताना देखील तीच अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी लोकांची भाषा बोलली पाहिजे. नेत्यांची भाषा बोलू नये, असंही त्यांनी सुनावलं.
त्यामुळे देशाची वाट लागली
राजकारणात भावाभावात विश्वास ठेवता येत नाही. आता शरद पवार यांचेच बघा ना? अजित पवार सत्तेत आहेत, शरद पवार विरोधात आहेत. माझी निष्ठा सामान्य माणसावर आणि माझ्या शेतकरी बापावर आहे. माझी निष्ठा कोणत्या नेत्यांवर-अभिनेत्यावर नाही. माझ्या डोक्यात कोणता नेता नाही. जात, पात, धर्म, पंथ नाही. माझ्या डोक्यात जनता आहे म्हणून मी चार वेळा आमदार निवडून आलो नाही. जनतेचा बाप कोण होऊ शकतो का? बापाप्रमाणे आता कोण आपुलकीने राहतं का? जनता हिच माय बाप असतात. बाप मेल्याचं दुःख नाही, पण नेत्या मेल्याचं दुःख कार्यकर्त्यांना असतं, असे गद्दार महाराष्ट्रात आहेत. बापापेक्षा नेता महत्वाचा वाटत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे लोकशाहीची आणि देशाची वाट लागली आहे, असंही त्यांनी सांगितलं.