धीरेंद्र शास्त्री यांचे वाद निर्माण करणारे वक्तव्य, हिंदूराष्ट्रासाठी घटनादुरुस्ती करा
Bageshwar dham programs in Pune | पुणे शहरात पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा सत्संगाचा कार्यक्रम सुरु आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान दिले. तसेच भारतीय राज्य घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी केली. हिंदू राष्ट्रासाठी पुन्हा एक वेळा संशोधन झाले तर काय हरकत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
योगेश बोरसे, पुणे, दि. 21 नोव्हेंबर | पुणे भाजपच्या माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान हनुमान कथा सत्संग होत आहे. या कार्यक्रमास विविध पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. यामुळे आधीच वादात असलेला बागेश्वर धाम सरकारकडून नवा वाद निर्माण करण्यात आला आहे. सनातन भारतीय संस्कृती आणि हिंदू एकता मजबूत करण्यासाठी आपला दरबार आहे. आपल्या दरबारासंदर्भात कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात जावे. भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत 700 वेळा संशोधन झाले आहे. यामुळे हिंदू राष्ट्रासाठी पुन्हा एक वेळा संशोधन झाले तर काय हरकत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीला दिले आव्हान
आपल्या कार्यक्रमासंदर्भात कोणाला आक्षेप असतील तर दरबारात या. आमनेसामने करू या, असे प्रतिआव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिले. हिंदू एकता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करणे, ती वाढवणे यासाठी आमचा दरबार आहे. आपल्या राज्यघटनेचा मी स्वीकार करतो. परंतु देशाच्या राज्यघटनेत आतापर्यंत अनेकवेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यामुळे आता हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी घटना दुरस्ती झाली तर काय हरकत आहे.
रामराज्यात सर्व धर्माचे लोक राहतील
आम्हाला आधी लोकांच्या मनात हिंदूराष्ट्र स्थापन करायचे आहे. लोकांच्या हृदयात आणि मनात हिंदूराष्ट्र स्थापन झाल्यानंतर संविधानातही हिंदूराष्ट्र होईल. या हिंदू राष्ट्रात इतर धर्माच्या लोकांना कुठे जाण्याची गरज नाही. कारण रामराज्यात सर्व धर्माचे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. यामुळे या रामराज्यात मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्माच्या लोकांना कुठे जाण्याची गरज नाही. रामराज्यात सामाजिक समरसता असणार आहे.
हिंदू राष्ट्रात हे चालणार नाही
हिंदूराष्ट्राची कल्पना सांगताना बागेश्वर धाम सरकारचे धर्मेंद्र शास्त्री म्हणाले की, हिंदू राष्ट्र म्हणजे आमच्या प्रभू श्रीरामाच्या यात्रेवर दगड फेकायचा नाही. पालघरमध्ये संतांबरोबर जे घडले ते करायचे नाही, हीच अपेक्षा आहे. हिंदू राष्ट्रात तुम्ही पालघर हत्याकांडातील आरोपी असाल, हिंदूच्या यात्रेवर दगड फेकणारे असाल तर तुमची तिरडी बांधली जाईल.
तुकाराम महाराजांबाबतच्या वक्तव्यावर मागितली माफी
बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर त्यांनी माफी मागितली. संत तुकाराम महाराज देवताप्रमाणे आहे. माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. माझे वक्तव्य बुंदेलखंडी भाषेत बोलताना चुकून आले. त्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी क्षमा मागणार आहे. पुण्याच्या या दौऱ्यात मला वेळ मिळाल्यास मी संत तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे.