अजित पवार यांच्या बंडाचा मोठा फटका, सुप्रिया सुळे यांच्या खासदारकीला ब्रेक लागणार?
सुप्रिया सुळे यांच्यासाठी आगामी काळ कठीण ठरण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांची खासदारकी धोक्यात जाणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर आता तशीच घटना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांच्या विरोधातच बंड थोपटलं. विशेष म्हणजे त्यांचे काका हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्वात दिग्गज नेते शरद पवार आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांनी केलेल्या निलंबनात अर्थ नाही. विशेष म्हणजे पक्षाच्या घटनेनुसार करण्यात आलेल्या नियुक्त्यादेखील बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी आपापली बैठक बोलावली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या बैठकीत 32 आमदारांनी हजेरी लावलेली. तर शरद पवार यांच्या बैठकीत 16 आमदारांनी उपस्थिती लावलेली. विशेष म्हणजे बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचाही समावेश आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आगामी काळ आव्हानांचा
अजित पवार यांच्या पाठीमागे सध्याच्या घडीला लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या मुद्द्यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसोबतही तसंच काही घडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे अजित पवार यांना याबाबत यश मिळत गेलं तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आगामी काळ कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्याला कारणही अगदी तसंच आहे.
सुप्रिया सुळे यांची खासदारकी धोक्यात?
सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण अजित पवारांच्या बंडामुळे खासदार सुप्रिया सुळेंच्या खासदारकीला ब्रेक लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. अजित पवार यांच्या बंडाचा सर्वात मोठा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कारण खासदार सुप्रिया सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ डेंजरझोनमध्ये आहे. बारामती लोकसभेतील सर्व आमदार सुळेंच्या विरोधात आहेत. सुळेंना लिड मिळवून देणारे इंदापूर आणि बारामती दोन्ही तालुक्यांचे आमदार सुळेंच्या विरोधात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.