Pune News | पुणे शहरातील भिडे पूल बंद, वाहतुकीत बदल
Pune News | पुणे शहरात डेक्कन बसस्थानकाजवळ असलेला भिडे पूल बंद करण्यात आला आहे. हा पूल बंद झाल्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पुणे मनपाने किती दिवस हा पूल बंद केला आहे...
पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला भिडे पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. डेक्कन बसस्थानक ते भिडे पुला दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे आता 15 डिसेंबरपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडे पुलावरून डेक्कन जिमखानाकडे जाणारी वाहतूक गरज पडल्यास बंद करण्यात येणार आहे. आता भिडे पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील इतर बातम्या
नवरात्रोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसर, चतुश्रृंगी मंदिर परिसर आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. तसेच आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार पेठेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. सेनापती बापट रोडवरुनही वाहतूक बंद करण्यात आली आहे. हे मार्ग बंद असल्याने दोन्ही मार्गावर पर्यायी मार्ग प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात चंदन तस्करांच्या घटना वाढल्या
पुणे शहरात चंदन तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. वर्षभरात चंदन चोरीच्या 25 घटना घडल्या आहेत. पुणे शहरातून चंदन चोरुन कर्नाटक, आंध्र प्रदेशात नेले जात आहे. पुणे शहरातील राजभवन पोलीस मुख्यालयातून देखील चंदन चोरीची घटना घडली आहे. चंदन तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या पुणे शहरात सक्रीय झाल्या आहेत. यामुळे चोरीचे प्रकार वाढले आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर गांजा जप्त
पुणे रेल्वे स्थानकावरुन 90 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानकात कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. 27 लाख रुपयांचा गांजा कोर्णाक एक्सप्रेसमधून जप्त करण्यात आला. पुणे कस्टम विभागाने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. ओडीसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी सुरू होती. कस्टम विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या.
भोर तालुक्यात रब्बीसाठी लगबग
पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दहा-बारा दिवसांपासून परतीचा पाऊस गेला आहे. खरिपाच्या पिकांची काढणी पूर्ण करून रब्बीच्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात शेताची पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने मशागत केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर कडधान्याची काढणी करून शेतीची मशागत केली जात आहे.