पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, आता २४ तास मिळणार ही सुविधा
Pune Polilce : पुणे शहरात तीन दिवसांपूर्वी भरदिवसा तरुणीवर कोयताने हल्ला झाला होता. त्यावेळी युवकांनी तिला वाचवले अन्यथा कठीण प्रसंग निर्माण झाला असता. या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेत २७ जून रोजी थरार झाला होता. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली होती. पेरुगेट पोलीस चौकीजवळ कोयता हातात घेऊन युवक युवतीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. ती युवती आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दिशने पळत सुटली होती.तिने आपला जीव वाचवण्यासाठी एका बेकरीतही घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरुन त्या बेकरीवाल्याने शटर बंद केले. यावेळी तिला लेशपाल जवळगे या युवकाने धाडसाने वाचवले. त्यानंतर नागरिकांनी कोयता घेऊन धावणारा शांतनु जाधव याला पेरुगेट पोलीस चौकीत नेले. परंतु त्या ठिकाणी पोलीस नव्हते. घटनेच्या अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी आले. या प्रकारामुळे पुणे पोलिसांवर चौफेर टीका होत असताना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
काय म्हणतात पोलीस आयुक्त
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले की, पुणे शहरात ३ दिवसांपूर्वी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी या दोघांचे समुपदेशन देखील सुरू केले आहे. पुणे शहरातील गुन्हेगारांविरोधात मोठ्या कारवाया पोलिसांकडून केल्या जात आहेत. ६ महिन्यांत ३१ जणांवर मोकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस चौकी २४ तास कार्यान्वित
पुणे येथील सदाशिव पेठेतील घटनेत पोलीस चौकीत पोलीस नव्हते. या प्रकरणी तीन जणांचे निलंबन करण्यात आले आहे. कोविड काळात किंवा त्याआधी पुण्यातील अनेक पोलीस चौकी बंद होत्या. त्या आता सुरू होणार असल्याची माहिती रितेश कुमार यांनी दिली. पुण्यातील पोलिस चौकी २४ तास कार्यान्वित करणे तसेच सीसीटीव्ही फुटेजचे मॉनिटर करणे सुरु होणार आहे. पुणे शहरात १११ पोलीस चौकी आहेत. त्या २ शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.
शाळा, कॉलेजमध्ये तक्रार बॉक्स
पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयात पोलीस आपली भूमिका निभावणार आहे. शाळा अन् महाविद्यालयात तक्रार बॉक्स ठेवण्यात येणार आहे. या तक्रार बॉक्समध्ये तक्रार देणारी तरुणी किंवा महिला असेल तर तिची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, तसेच तक्रार येताच त्याची दखल घेतली जाईल, असे रितेश कुमार यांनी सांगितले.
हे ही वाचा
पुणे कोयता हल्ल्यातून वाचलेल्या मुलीनेच सांगितली आरोपीची A to Z माहिती