सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री… सर्वकाही सेट, कुणाचा होता अजेंडा?; चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा
एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना डॅमेज करू शकत नाही. शिवसेना आमच्यासोबत आहे आणि सोबत राहील हे 2024 मध्ये दिसेलच. थोडा गैरसमज किंवा समज त्यामुळे काही फरक पडणार नाही.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीशी संबंधित हा गौप्यस्फोट आहे. बावनकुळे यांच्या मते उद्धव ठाकरे हे लवकरच मुख्यमंत्रीपद सोडणार होते, असा अप्रत्यक्ष दावाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जागी कोण मुख्यमंत्री होणार होतं आणि कोण उपमुख्यमंत्री होणार होतं, हे सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. इतकच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी आधी कुणाच्या नावाची पसंती होती, याचा गौप्यस्फोटही त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री असून पहाटेपासून मंत्रालयात यायचे. बैठका घ्यायचे. कामाचा निपटारा करायचे. कारण राज्यात पेन नसलेला मुख्यमंत्री होता. मुख्यमंत्री मंत्रालयातच फिरकत नव्हते. त्यामुळे हे सरकार राहिलं तर आमची संख्या दहावर आल्याशिवाय राहणार नाही, असं शिवसेनेचे अनेक आमदार म्हणायचे, असं सांगतानाच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्लॅन होता. आधी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. पण अचानक सुप्रिया सुळे यांचं नाव आलं, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. हा अजेंडा राष्ट्रवादीचा असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीची यादी तयार होती
राष्ट्रवादीकडून एक यादी तयार करण्यात आली होती. ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. तिथे शिवसेनेचं वर्चस्व कमी करायचं. आपलं जाळं पसरायचं, असं राष्ट्रवादीचं ठरलं होतं. त्याची कुणकुण लागल्यानेच शिवसेनेचे आमदार बाहेर पडले. राष्ट्रवादी आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ करत असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती, असंही त्यांनी सांगितलं.
बीआरएस बी टीम नाही
यावेळी त्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्रातील वाढत्या प्रभावावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नॅरेटिव्ह सेट करतात. कोणीही आला की बी टीम म्हणून संबोधलं जातं. आमचेच लोक त्यांच्या पक्षात गेलेत. बीआरएस आमची बी टीम नाही. शरद पवार आणि काँग्रेसला नव्या पक्षाची भीती वाटत आहे. बीआरएसशी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना मान्य आहे काय?
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेलं एक मत किती धोकादायक हे उद्धव ठाकरे यांना कळलं असेल. राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून त्यांनी सावरकरांचा धडा काढला. धर्मांतर कायदा बदलला. उद्धव ठाकरे लंडनमध्ये आहेत. काँग्रेसचे हे निर्णय उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? कालपासून उत्तर मिळाले नाही, असंही ते म्हणाले.
होईल तेव्हा होईल
यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारावरही विचारण्यात आलं. त्यावर, मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचाय तेव्हा होईल, असं विधान त्यांनी केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.