ना साडीचोळी, ना टॉवेल टोपी, ना दस्ती, ना उपरणं… वधूपित्यानं दिलं वऱ्हाडींना अनोखे गिफ्ट; चर्चा तर होणारच
पुरंदर तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात वधूपित्याने लग्नाला आलेल्या प्रत्येक वऱ्हाडीला वृक्ष देऊन त्यांचं स्वागत केलं. तसेच झाडांची जोपासना करा, झाडे तोडू नका, असं आवाहनही त्यांनी वऱ्हाडी मंडळींना केलं.
पुणे : लग्न म्हटलं तर लग्नात आहेर हा आलाच. लग्नाला आलेल्या वऱ्हाडीकडून वर आणि वधूला आहेर दिला जातो. मग तो पैशांचा असतो, दागिण्याचा असतो किंवा भांड्यांचा असतो. काही लोक कपडेही आहेर म्हणून देतात. काही लोक शोपिसही आहेर म्हणून देतात. त्यामुळे आहेर देणाऱ्या वऱ्हाडींना वधूपित्याकडून रिटर्न गिफ्ट दिलं जातं. साडीचोळी, टॉवेल टोपी, दस्ती किंवा उपरणं रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं जातं. हे गिफ्ट नाही मिळालं तर कधी कधी रुसवाफुगवीही होते. पण पुरंदर तालुक्यातील एका लग्नात अनोखीच गोष्ट घडली. वधुपित्याने दिलेल्या रिटर्न गिफ्टमुळे सर्वच सुखावले. इतकेच नव्हे तर या रिटर्न गिफ्टची गावभर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शेतकरी वधूपित्याने आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळमुक्तीचा उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. लग्नाला आलेल्या वऱ्हाडींना वधूपित्यानं अनोखा आहेर दिला आहे. लग्न म्हटलं की बँडबाजा, वरात, धमाल, मस्ती आणि धांगडधिंगाणा आलाच. आपलं किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न अविस्मरणीय करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या अजमावतात. वाल्हेतही अशीच क्लृप्ती वधूपित्याने अवलंबली.
नवरदेव-नवरीच्या हस्ते वृक्षारोपण
तेजस्वी मनोज भुजबळ हिचा मुंढवा येथील ऋषभ विजय कोद्रे यांच्याशी हडपसर येथे मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. वाल्हे येथील मनोज भुजबळ आणि मंजुषा भुजबळ या शेतकरी दाम्पत्याने वृक्षतोडीमुळे पडलेल्या दुष्काळाचे चित्र नजरेसमोर ठेऊन आपली मुलगी तेजस्वीच्या लग्न समारंभामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे संदेश देण्यासाठी अनोखा असा उपक्रम राबविला. लग्न मांडपात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करणारे अनेक फलक लावले. वरात विवाहस्थळी येताच लग्न मंडपात प्रवेश करण्यापूर्वी नवरदेव व नववधूच्या हस्ते मांडवाबाहेरच वृक्षारोपण करण्यात आले.
अंबा, चिंच, गुलाब, सीताफळ
एवढेच नव्हे तर विविध वृक्षांच्या रोपट्यांचा हटके आहेर लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना एक आठवण म्हणू भेट दिली. विशेष म्हणजे रोप वाटप करते वेळेस प्रत्येक पाहुण्यांना मार्गदर्शन करून पर्यावरणाचे चित्र समोर ठेवले. या वृक्षलागवडीचा संदेशही त्यांनी या संकल्पनेतून दिला. आपण या पुढे कुठलेही झाडे तोडणार नाही आणि या वृक्षाचे आपल्या मुलाप्रमाणेच सांभाऴ करा असा आपुलकीचा सल्लाही भुजबळ दाम्पत्याने दिला.यावेळी पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते वऱ्हाडीमंडळींना आंबा, चिंच, वड, गुलाब, सीताफळ आदी झाडांचे वाटप करण्यात आले.