पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र देणे आले अंगलट, पोलिसांनी केली मोठी कारवाई
pune police bharti 2023 : पुणे पोलीस दलातील शिपाई पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. 720 पोलिस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले होते. परंतु या प्रकरणी काही जणांनी बनावट प्रमाणपत्र दिले.
पुणे, अभिजित पोते : गेल्या तीन वर्षांपासून रखडली राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया नुकतीच झाली होती. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या भरती प्रक्रियेनंतर काही जणांची निवडही करण्यात आली. परंतु या निवड प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र देणे अंगलट आले आहे. या उमेदवारांची अवस्था बाबाही गेल्या अन् दशम्याही गेल्या, अशी होणार आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे उमेदवारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस दलातील चालक अन् शिपाई भरती प्रकरणात ही कारवाई झाली आहे.
काय झाली कारवाई
पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप होत होता. या भरती प्रक्रियेत अनेक लोकांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर पोलिसांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. त्यात ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोघांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहेत आरोपी
बनावट प्रमाणपत्र देणारे दोन्ही जण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सुजित शिवाजी साळुंखे (वय-25 रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय-26 रा. वडोली, ता. माढा जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजित आणि शरद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होती. एकूण चौदा हजार जागांसाठी ही प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी अठरा लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यावर अनेक ठिकाणी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकार घडले होते.