तुम्ही पाटील आहात जोशी बुवाचं काम कधीपासून करायला लागलात?; भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या 10 मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या भविष्यवाणीची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे.
पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येत्या 10 मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या भविष्यवाणीची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. तुम्ही पाटील आहात. जोशीबुवांचं काम कधीपासून करायला लागलात? असा खोचक सवाल छगन भुजबळ यांनी पाटील यांना केला आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक ठिकाणची सरकारं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच गोव्यात उद्या मतदान होत आहे. गोव्यात भाजप सोडून सर्वच सत्तेवर येतील, असा छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आज येथे केला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
छगन भुजबळ यांनी यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यांच्या सचिवांनी अण्णांसोबत चर्चा केली आहे. त्यांची बैठक अजूनही सुरू आहे. त्यात काय निर्णय होतो ते पाहू, असं भुजबळ यांनी सांगितलं.
उद्या राज्यपालांच्या हस्ते उद्गाटन
पुणे विद्यापीठाची आज सगळी पाहणी केलीये. उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावतील, असंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आघाडी सरकार 10 मार्चनंतर जाणार असल्याचं म्हटलं होतं. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले. तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल’, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
Pushpa fever : राजकारण्यांनाही चढला पुष्पाचा ज्वर, आता बीडचे संदीप क्षीरसागर म्हणतायत…