निर्बंध शिथील झाल्याने कोरोना वाढला? पुणे शहरात बाधित दर 6.88% वर तर ग्रामीण भागात कोरोनासंख्या घटली
पुण्यात काल एका दिवसांत 399 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा (Corona Patient) दर हा 6.88 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोना (Pune Corona) आटोक्यात आल्याचं चित्र होतं. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे की काय अशी भीती निर्माण होत आहे. कारण पुण्यात काल एका दिवसांत 399 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा (Corona Patient) दर हा 6.88 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांत पुण्यात कोरोनासंख्या स्थिर असल्याची दिसत होती. पण बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचं दिसतंय. (Corona has increased in Pune city due to relaxation of corona restrictions)
का वाढतेय कोरोना रुग्णसंख्या?
रविवारी कमी चाचण्या होत असल्याने सोमवारी बाधितांची संख्या 100 पेक्षाही खाली आली होती. त्यानंतर बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली आहे. पुणे शहराचा बाधित दर हा पाच टक्क्यांच्या खाली आल्याने शहरात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठा, रेस्टॉरंट आणि दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणांवरही गर्दी वाढल्याचं चित्र आहे. यामुळेच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे.
ग्रामीण भागात दैनंदिन रुग्णसंख्येत घट
एकीकडे पुणे शहरात कोरोनाबाधितांचा दर वाढला असला तरी ग्रामीण भागात मात्र, दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेले आठ दिवस पुणे ग्रामीणमध्ये बाधित दर हा दोन ते चार टक्क्यांच्या आथ राहिला आहे. ग्रामीण भागात सरासरी पाचशेच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. मध्यंतरी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली होती. पण ग्रामीण भागात बाधितांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. पण गेल्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या चार दिवसांत ही रुग्णसंख्या चारशे ते पाचशे दरम्यान राहिली आहे.
95 गावं अजूनही हॉटस्पॉट
पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर हॉटस्पॉट गावांची संख्या अजूनही 95 आहे. त्यामध्ये सर्वाधिक 26 गावं ही शिरूर तालुक्यातली आहेत. या हॉटस्पॉट गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. वेल्हा आणि भोर तालुक्यातल्या हॉटस्पॉट गावांची संख्या शून्यवर आली आहे. काही औद्योगिक वसाहती असलेल्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचं आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावांसह सर्वच ठिकाणी धडक चाचण्यांची मोहीम हाती घेतली होती. या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
चाचण्यांचं प्रमाण वाढवलं, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
सर्व तालुक्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याने कोरोनाबाधितांचा दर कमी झाला असल्याचं जिल्हा परिषदेने सांगितलं आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा दर कमी होत असला तरी चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
खेड, जुन्नर, पुरंदर आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
इतर बातम्या :