Pune Corona Vaccine | पुण्यातून आनंदाची बातमी, 443 गावात 100 टक्के लसीकरण
दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन (Omicron) आढळून आला आहे. या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे देशातही खळबळ माजली आहे. मात्र, यासर्वात पुण्यातून एक आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील 443 गावांनी 100 टक्के लसवंत ठरली आहेत.
पुणे : आता कुठेतरी कोरोनाच्या त्रासातून जग सावरत होतं. मात्र, कोरोनाचा नवा अवतार म्हणजेच ओमिक्रॉन व्हायरसने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन (Omicron) आढळून आला आहे. या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे देशातही खळबळ माजली आहे. मात्र, यासर्वात पुण्यातून एक आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील 443 गावांनी 100 टक्के लसवंत ठरली आहेत.
443 गावांतील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण
पुणे जिल्ह्यातील जवळपास 443 गावांतील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण केल्याने ही गावे 100 टक्के लसवंत ठरली आहेत. वाढत्या लसीकरणामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित आणि मृत्यूदरातही घट झाली आहे. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत पुणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
यामध्ये मुळशी तालुक्यातील 134 गावांमध्ये 100 टक्के लसीकरण झाले आहे. तर वेल्हे तालुक्यात 54, भोरमध्ये 41, इंदापूर तालुक्यात 38 गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेलं आहे. तर जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वात कमी लसीकरण झाल्याची नोंद आहे.
दक्षिण आफ्रिकेवरुन डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत. डोंबिवलीत आढळून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणीही केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
‘लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’ – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत रविवारी टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत. कोव्हिडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
संबंधित बातम्या :
‘कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक ते सर्व करा,’ मुख्यमंत्री ठाकरेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश