Cyclone | बंगाल उपसागरात चक्रीवादळ, राज्यात पुन्हा पावसाचा धोका
Michaung Cyclone : नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात 'मिचौंग' चक्रीवादळ तयार होत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पाऊस पडणार आहे. दक्षिण भारतात या वादळाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात इशारा दिला आहे.
पुणे | 2 डिसेंबर 2023 : भारतात पुन्हा नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे ३ डिसेंबर रोजी नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ चक्रीवादळ येणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या दक्षिण भागात चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार आहे.
तीन ते पाच डिसेंबरपर्यंत परिणाम
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र चक्रीवादळात बदलणार आहे. 3 डिसेंबरपासून 5 डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालचा उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ताशी ९ किमी वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. आता पुढील १२ तासांत हे वादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होणार आहे.
📢3 डिसेंबरला बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ. नंतर ते दक्षिण आंध्र प्रदेश किनार्याला समांतर जात उत्तरेकडे सरकेल.नेल्लोर-मछलीपट्टणम दरम्यान 5 डिसेंबर दुपारच्या दरम्यान चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश ओलांडून 80-90 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह होईल. Gusting 100kmph.: IMD, 1 Dec. pic.twitter.com/A0R73zEdZU
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 1, 2023
केंद्र आणि राज्य सरकार सतर्क
चक्रीवादळाच्या धोक्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेत आढावा घेतला. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील १२ जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. चक्रीवादाळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबईत तापमान घसरणार असून हवेचा कडाका वाढणार आहे.
ऑक्टोंबर महिन्यात आले होते ‘तेज’
अरबी समुद्रात दोन महिन्यांपूर्वी तेज चक्रीवादळ आले होते. २१ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्याचक्रीवादळास ‘तेज’ हे नाव देण्यात आले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ २६ ओमानच्या दिशेने जाऊन शांत झाले होते.