Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांना सीबीआय समन्स, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले. केजरीवाल यांचे कधीकाळी गुरु म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
पुणे : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात सीबीआयने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी समन्स बजावले. यासाठी केजरीवाल यांना येत्या 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात असताना अरविंद केजरीवाल यांचे गुरु म्हणून ओळखले जाणारे अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले अण्णा हजारे
केजरीवाल यांच्या चौकशीसंदर्भात अण्णा हजारे पुढे म्हणाले की, मी यापूर्वीही केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. तुम्ही दारूबद्दल का विचार करता, चांगल्या गोष्टींचा विचार करा, पैशासाठी काहीही करणे योग्य नाही, दारूने कधीही कोणाचे भले झाले नाही, असे त्यात लिहिले होते. आता या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत केजरीवाल दोषी आढळल्यास शिक्षा झाली पाहिजे.
माझ्यासोबत जेव्हा केजरीवाल होते, तेव्हा त्यांना नेहमी विचार आणि आचरण शुद्ध ठेवा,असे सांगत होतो. मनिष सिसोदिया यांच्यासारखे व्यक्ती तुरुंगात आहे.याबद्दल खूप वाईट वाटते. स्वत:साठी नाही तर समाज आणि देशासाठी नेहमीच चांगले असावे, हाच माझा सर्वांना सल्ला आहे, असे अण्णा यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
सीएम केजरीवाल यांनी मद्यविक्रेते आणि अबकारी धोरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी समीर महेंद्रू यांच्याशी फेसटाइम कॉलवर चर्चा केली. हे संभाषण आम आदमी पार्टीचे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी केले. ईडीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 12 आणि 15 नोव्हेंबर रोजी चौकशीदरम्यान समीर महेंद्रूने अधिकाऱ्यांना सांगितले होते की विजय नायरने अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली होती, परंतु जेव्हा चर्चा निष्पन्न झाली नाही तेव्हा विजयने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या फेसटाइम कॉलवर बोलावले. अरविंद केजरीवाल यांनी केजरीवाल यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली.
सिसोदिया यांना झाली आहे अटक
सीबीआयने या प्रकरणात याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक केली होती. सीबीआयने मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारीला अटक केली होती. सिसोदिया यांची ईडीनेदेखील चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जेलमधून मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. ईडीने नंतर रिमांडवर घेऊनही सिसोदिया यांची चौकशी केली होती. या प्रकरणी सिसोदिया यांनी राउज ऐवन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला होता.