Lalit Patil | ललित पाटील याने आजारपणाचे कसे केले नाटक…Video आला समोर
Lalit Patil | ड्रग्स माफिया असलेला ललित पाटील हा गुन्हेगारच नाही, एक कलाकार असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी त्याने केलेल्या नाटकाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या नाटकानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता.
पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याचे एक-एक किस्से समोर येत आहे. रुग्णालयात राहून सर्व सुविधा मिळवण्याची कर्तबगारी त्याने केले होती. तसेच रुग्णालयात असताना हॉटेलमध्ये रुम बुक त्याने करुन ठेवली होती. त्याठिकाणी त्याला त्याच्या मैत्रिणी भेटण्यास येत होत्या. या प्रकरणात त्याचे एक-एक किस्से उघड होत आहे. त्याला मदत करणाऱ्या सर्वांची आता अडचण होणार आहे. दरम्यान ललित पाटील याचा २०२० मधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रुग्णालयात दाखल होण्यासाठी ललित पाटील याने कसे नाटक केले होते? ते दिसत आहे.
काय आहे व्हिडिओत
ललित पाटील आजारपणाचा नाटक करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. २०२० मधील हा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यावेळी हिंजवडी पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली होती. ठाणे येथील एका ड्रग्स तस्करी प्रकरणात ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणले. तेव्हाचा हा व्हिडिओ समोर आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात ललित पाटील याला आणल्यावर तो जिन्यावरुन चालत असल्याचे दिसत आहे. आजारपणाचे नाटक तो करत आहे. जिन्यावरून उतरत असताना पडल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्याला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ललित पाटील याची कोठडी वाढणार का
ललित पाटील याच्या पोलीस कोठडीची मुदत आज पूर्ण होत आहे. त्याची पोलीस कोठडी आज पुन्हा वाढवून मागण्यात येणार आहे. मुंबई पोलीस त्याला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहे. यावेळी त्याच्या चौकशीतून आलेली माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला नाशिकला नेऊन तपास केला होता.
अरविंद लोहारे याला कोठडी
ललित पाटील याला ड्रग्स बनवण्याचा फार्मूला देणाऱ्या अरविंद लोहारे याला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तसेच भूषण पाटील आणि बालकवडे या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. कारागृहात लोहारे याने ललित पाटील याला एमडी ड्रग्स बनवण्याचा फार्मूला दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. अरविंद लोहरे याने आतापर्यंत १० केमिकल कंपनीत काम केले आहे. महाडला त्याची स्वत:ची कंपनी होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.