Rain : बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार
weather update and rain : राज्यात अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा पुरेसा नाही. आता आयएमडीने महत्वाची माहिती दिली आहे.
पुणे, दिनांक 16 जुलै 2023 : जुलैचा पंधरवाडा लोटला त्यानंतरही राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. धरणांमध्ये सध्या फक्त ३० टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांत सरासरी १६ टक्के कमी जलसाठा आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे अजून भरलेली नाही. अजूनही सर्वत्र पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील मोठ्या, मध्यम, लघू धरणांमध्ये १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. परंतु आता राज्यात पाऊस जोर पकडणार आहे.
काय आहे अपडेट
बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातील पावसावर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. १५ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणार आहे. त्यानंतर १९ जुलै रोजी आणखी एक चक्रीवादळ तयार होईल. यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे.
कोकणात ऑरेंज अलर्ट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. यामुळे 17 व 18 जुलै या काळात कोकण किनारपट्टीसह अन्य भागातही पावसाचा जोर वाढवण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिला आहे. कोकणात 17 ते 22 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे. हवामान विभागाकडून 17 आणि 18 जुलैला कोकणात ऑरेंज अलर्ट दिला आहे.
15 Jul,बंगालच्या उपसागरावर CYCIR ची निर्मिती झाली आहे व NW दिशेने आत जाण्याची दाट शक्यतात्यानंतर लगेचच आणखी एक CYCIR, 19 जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यताया दोन्ही प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यताPl see IMD updates
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 15, 2023
एनडीआरएफची टीम तैनात
चिपळूणमध्ये NDRF ची टीम दाखल झाली आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती मदत कार्यासाठी ही टीम आता चिपळूणमध्येच राहणार आहे. डॉक स्कॉड आणि साहित्यासह NDRF टीम चिपळूण शासकीय रेस्ट हाऊसला मुक्कामी राहणार आहे.
पुण्यात पाऊस
पुण्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन, नवी पेठ,सदाशिव पेठ भागात पावसाची दमदार हजेरी लावली. पुण्यात आज पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. संततधार पावसामुळे वेसरफ लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावातून 66 क्युसेक्सचा विसर्ग सुरु केला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.