ईडीला मिळाले मुलचंदानीच्या घरी घबाड, तीन कोटींचे सोने, हिरे , रोख रक्कम
ईडी अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यावर सुमारे साडे आठ तास अमर मुलचंदानी वरील मजल्याच्या खोलीत लपून बसला होता.
पिंपरी चिंचवड, पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. या प्रकरणात अमर मूलचंदान यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.
सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्याकडे २७ जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांच्या तपासात अमर मूलचंदानी यांच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही. उलट पुरावा नष्ट केले. या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अमर मलचंदानी, अशोक मुलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी व सागर मूलचंदानी अशा सहा जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी मागितली. परंतु न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
घरी सापडले घबाड
ईडीच्या अधिकाऱ्यांना मूलचंदानी यांच्या घरी सोने, हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम मिळाली आहे. दोन कोटी ७२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्यांचे दगिने व ४१ लाख रुपये रोख मिळाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चार अलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत.
घरात लपला होता मूलचंदानी
ईडीचे अधिकारी छापेमारीस आले तेव्हा अमर मूलचंदानी यांच्या नातेवाईकांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर सीआरपीएफ अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. अमर मूलचंदानी घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी एका खोलीत अमर मूलचंदानी सापडले. त्या खोलीला बाहेरुन कडी लावण्यात आली होती.
ईडीने दिली फिर्याद
ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ईडी अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यावर सुमारे साडे आठ तास अमर मुलचंदानी वरील मजल्याच्या खोलीत लपून बसला होता. त्याने अनेक पुरावे नष्ट केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.
यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.
नुकतेच आले होते जामिनावर बाहेर
अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.