लोकसभा निवडणुकीची तयारी, निवडणूक आयोगाने उचलली ही पावले
lok sabha election | लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. त्याचवेळी निवडणूक आयोगाने लोकसभेची तयारी सुरु केली आहे.
पुणे | 28 ऑक्टोंबर 2023 : लोकसभेची निवडणूक एप्रिल 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. मतदार संघातील उमेदवारांवर चर्चा होत आहे. भाजपकडून विविध मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय नेत्यांना दिली आहे. भाजपविरोधात एकत्र आलेल्या ‘इंडिया’ आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चाबांधणी सुरु करण्यात आली आहे. त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मतदार यादी अद्यावत केली जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्याची प्रारूप मतदार याद्दी प्रसिद्ध केली आहे.
प्रारुप मतदार यादीत मतदार वाढले
राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्दी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १० महिन्यांत १ लाख मतदार वाढले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ८० लाख ७३ हजार मतदारांची संख्या झाली आहे. प्रारुप मतदार यादीवर ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. प्रारुप मतदार यादी निवडणूक आयोगाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या युवकांचे प्रमाण कमी
देशाच्या लोकसंख्येत 18 ते 19 वर्षे वयोगटामधील तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. परंतु मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे केवळ अर्धा टक्के आहे. यामुळे 18 ते 19 वर्षे वयोगटामधील युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. युवा मतदारांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार यादीत २० ते २९ वयोगटाच्या युवकाची लोकसंख्या २३.८६ टक्के आहे. म्हणजेच २८ लाख २७ हजार ३७६ इतकी आहे. जानेवारी २०२३ च्या मतदार यादीमध्ये पुणे जिल्ह्यात १ हजार पुरुषांच्या मागे ९०८ महिल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात १ हजार पुरुषांमागे ९१० स्त्री मतदार आहेत.