आम्हाला कचरा म्हणता, हिंमत असेल तर 12 तासाच्या आत राजीनामा द्या; संजय राऊत यांना कुणाचे आव्हान?
बाष्कळ बडबड करू नका.तुमचा चेहरा पाहण्याचाही जनतेला वीट आलाय. संजय राऊत म्हणजे आयजीच्या जीवावर बायजीचा उद्धार आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
पुणे: सर्व चोर, लफंगे शिंदे गटात गेले आहेत. हा कचरा होता. पानगळ होती. ती शिंदे गटात गेलीय, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी समाचार घेतला आहे. आम्हाला कचरा म्हणता? हिंमत असेल तर 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या. उगाच बाष्कळ बडबड करू नका. राजीनामा द्या. मग तुम्हाला तुमची लायकी कळेल, अशी टीकाच विजय शिवतारे यांनी केली आहे. विजय शिवतारे यांनी एक व्हिडीओ शेअर करून ही टीका केली आहे.
शिवसेनेचे 40 आमदार, खासदार हे कचरा आहेत. झाडाची पानगळ आहेत असं चुकीचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत साहेब आपला जन्मच या कचऱ्यातून झाला आहे. याला कचरा म्हणत असाल, तुम्हाला आम्ही कचरा वाटत असेल, तुमच्यात हिंमत असेल तर उद्याच्या उद्या खासदारकीचा आधी राजीनामा द्या आणि राज्यातून कोणत्याही भागातून निवडून येऊन दाखवा. तुम्हाला तुमची लायकी कळेल, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.
याच आमदार आणि खासदारांच्या मतांवर तुम्ही राज्यसभेत पोहोचला आहात. मीही तुम्हाला दोनदा मतदान केलं आहे. मलाही तुम्हाला तेवढं बोलण्याचा अधिकार आहे. एवढाच कचरा वाटत असेल तर राजीनामा द्या. हिंमत असेल तर 12 तासाच्या आत स्वाभिमानाने खासदारकीचा राजीनामा द्याआणि निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हानच त्यांनी राऊत यांना दिला आहे.
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करू नका. जरा निवडणुकीला उभे राहा. म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळेल. अशा प्रकारे विधान करण्याऐवजी सर्वजण कचरा वाटत असेल तर या कचऱ्याच्या जीवावर निवडून आला, त्याचा राजीनामा द्या ना, असंही ते म्हणाले.
बाष्कळ बडबड करू नका.तुमचा चेहरा पाहण्याचाही जनतेला वीट आलाय. संजय राऊत म्हणजे आयजीच्या जीवावर बायजीचा उद्धार आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, काल नाशिकमधील ठाकरे गटाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि तालुका प्रमुख होते.
त्यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पक्षातून जाणाऱ्यांना कचरा असं संबोधून हिणवलं होतं. त्यालाच शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.