लष्करातील मेजरही निघाला बनावट, मग कसा अडकला जाळ्यात
Pune Cirme News : पुणे शहरात पंतप्रधान कार्यालयातील बनावट अधिकारी सापडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता भारतीय लष्करातील बनावट मेजर सापडला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित पोते, पुणे : विविध विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचा दावा करणारे अनेक बनावट अधिकारी सध्या उजडेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी किंगडम ऑफ टोंगा या विद्यापीठाला पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगत किरण पटेल याने फसवले होते. त्यानंतर पंतप्रधानांचा डेप्युटी सेक्रेटरी असल्याचा बनाव करणारा तोतया आयएएस अधिकारी वासुदेव निवृत्ती तायडे याला पुण्यात अटक केली आहे. आता पुण्यात बनावट मेजर सापडला आहे.
काय केले त्या मेजरने
पुण्यातून कर्नाटकातील बनावट मेजरला ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. चिखली येथे सापळा रचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तो भारतीय सैन्यात मेजर या पदावर असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करत होतो. पुण्यातील लष्कराच्या गुप्तचर विभागाने त्याला पकडले.
कोण आहे प्रशांत पाटील
प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२) हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मुळचा कर्नाटकातील असणारा प्रशांत पाटील सध्या तो चिखलीतील सोनवणेवस्ती येथे राहतो. त्याने भारतीय लष्करात अधिकारी असल्याचे भासवून लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याकडून दोन गणवेश विकत घेतले. त्याने खडकी येथील दुकानदार सुरेश मोरे यांच्याशी संपर्क साधला.त्यांच्याकडून त्याने दोन युनिफॉर्म खरेदी केले. त्या साहित्याचे चार हजार ७०० रुपये झाले होते. मात्र ते पैसे त्याने दिले नाही. आपण २०१९ पासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असल्याचे तो सांगत होतो.
बनावट ओळखपत्र
प्रशांत पाटील याने सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करण्यासोबत गणवेशातील फोटो लावून बनावट ओळखपत्र तयार केले. त्यानंतर तो सदनकमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन पुणे याठिकाणी अधिकारी असल्याचे सांगत होता. तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयातील पत्त्याचा वापर करून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड काढून तयार केले होते. त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.