पुण्याकडे येणाऱ्या विमानांना उशीर, विमानतळावर प्रचंड गोंधळ
Pune AirPort | विमानाची अडीच तास वाट पाहिल्यानंतर काहीही माहिती मिळाली नाही. पुणे आणि कोलकाता या शहरांकडे जाणारी दोन्ही विमाने एअर इंडिया कंपनीची होती. यामुळे पुण्याला जाणारे शेकडो प्रवासी दिल्ली विमानतळावरच अडकले होते.
संदीप राजगोळेकर, नवी दिल्ली, दि. 6 फेब्रुवारी 2024 | गेल्या काही दिवसांपासून विमानांना उशीर होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीमुळे धुके निर्माण होत आहे. यामुळे विमानांना उशीर होत असण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले. तसेच धुक्यांमुळे विमानांची उड्डाने रद्द करण्यात आल्याचे प्रकारही घडले होते. सोमवारी दिल्लीहून पुण्याला आणि कोलकत्त्याला जाणारी दोन्ही विमानांना उशीर झाला. याबाबत कंपनीकडून किंवा विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. यामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला. सोमवारी रात्री दिल्लीच्या विमानतळावर प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल 3 वरची ही घटना आहे.
शेकडो प्रवाशी अडकले
दिल्ली विमानतळावर सोमवारी रात्री पुणे शहराकडे विमान निर्धारित वेळेत आले नाही. प्रवासी वाट पाहत होते. परंतु त्यासंदर्भात कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. विमानाची अडीच तास वाट पाहिल्यानंतर काहीही माहिती मिळाली नाही. पुणे आणि कोलकाता या शहरांकडे जाणारी दोन्ही विमान एअर इंडिया कंपनीची होती. यामुळे पुण्याला जाणारे शेकडो प्रवासी दिल्ली विमानतळावरच अडकले होते. या विमानांच्या उड्डाणास उशीर का होत आहे, त्याची माहिती देण्यात येत नव्हती.
विमानतळ प्रशासन किंवा कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने प्रवासी आक्रमक झाले. यामुळे विमानतळावर गोंधळ झाला. यासंदर्भात माहिती वेळीच दिली गेली असती तर गोंधळ टाळता आला असता.
पुणे-वाराणसी विमानसेवा सुरु होणार
वाराणसी-पुणे इंडिगो विमानसेवा ११ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. थेट फ्लाइट 6E 672 पुण्याहून रात्री 11.55 वाजता उड्डाण करेल आणि 1.55 वाजता बाबतपूर विमानतळावर पोहोचेल. हे विमान 6E 6884 होईल आणि दुपारी 2:40 वाजता बाबतपूर विमानतळावरून उड्डाण करेल आणि पहाटे 5 वाजता पुण्याला पोहोचेल. या सेवेमुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांनी सांगितले.
हे ही वाचा
पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी महत्वाचा बदल, नवीन टर्मिनल गाठणे होणार सोपे