पुण्याच्या नामांतराचा वाद पेटला, हिंदू महासंघ आणि मिटकरी आमनेसामने; कोण काय म्हणालं?
पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे.
पुणे: ऐन पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या नामांतराचा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोर मिटकरी यांनी पुण्याच्या नामांतराची मागणी लावून धरली आहे. तर हिंदू महासंघाने या मागणीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या नामांतराच्या वादावरून संपूर्ण पुण्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद निर्माण झाल्याने पुण्याच्या निवडणुका या नामांतराभोवती फिरणार असल्याचं चित्रं दिसत आहे.
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/9mt46cpYWD
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 13, 2023
भाजप नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून पुण्याच्या नामांतराची मागणी केली. पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
सुप्रिया सुळेंची सावध भूमिका
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काल सिंदखेडराजा येथे आल्या होत्या. जिजाऊंच्या दर्शनानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्याच्या नामांतरावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार पुढे मांडल्या पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे न्याय मिळेल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
आनंद दवे काय म्हणाले?
तर, मिटकरी यांच्या या मागणीला हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी विरोध केला आहे. पुण्याच्या नामांतराची गरज नाही. जिजाऊंच भव्य आणि वेगळं स्मारक उभारा. ते लाल महाल येथे उभारा, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शि भक्त शिवछत्रपती यांनी सुद्धा ते बदलले नाही, असं सांगतानाच त्यापेक्षा पुण्यश्वर महादेवाला त्या दर्ग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडने आमच्या बरोबर यावे. राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल, असा टोलाही दवे यांनी लगावला आहे.
नगरच्या नामांतराच्या हालचाली
दरम्यान, संभाजी ब्रिगेडनेही पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीनेही जोर धरला आहे. नगरचं नाव अंबिका नगर करण्याची मागणी होत आहे. भाजपकडून तशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारकडूनही नामांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या नामांतराच्या मुद्द्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.