Supriya Sule : अध्यक्षपद मिळाल्यावर काय निर्णय घ्यायचा होता?, सुप्रिया सुळे का होत्या अस्वस्थ?; इन्साईड स्टोरी काय?
वय वाढल्यावर काही जबाबदाऱ्याही वाढतात. भुजबळ जसे फॅक्च्युअली बोलू शकतात. ते मीही बोलू शकते. काही गोष्टी पर्सनल असतात. दोन लोकांमधील चर्चा असते. ती बाहेर बोलायची नसते. त्याला प्रगल्भता म्हणतात. त्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटातही याच मुलाखतीची चर्चा सुरू आहे. या मुलाखतीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडीही चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, अध्यक्ष झाल्यावर सुप्रिया सुळे यांना एक निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे सुप्रिया सुळे अस्वस्थ होत्या. काय निर्णय घ्यायचा होता? सुप्रिया सुळे का अस्वस्थ झाल्या होत्या? सुप्रिया सुळे यांनीच त्यावर आज भाष्य करून नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर भाष्य केलं. मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते. तसा प्रस्ताव होता. पण त्यात दोन गोष्टी होत्या. त्या मला अस्वस्थ करणाऱ्या होत्या. शरद पवार यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती. भाजपसोबत जाणं आमच्या विचारधारेत बसणारं नव्हतं. मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसोबत जाण्याचा घ्यायचा होता. ते करणं मला शक्य नव्हतं. माझ्या विचारधारेशी मी तडजोड करू शकले नसते. मी त्यामुळे अस्वस्थ होते. एकीकडे सत्ता होती आणि दुसरीकडे संघर्ष होता. पण मी विचारधारा आणि तत्त्वांशी धरून होते, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
पवारांना अंधारात ठेवून निर्णय
मी छगन भुजबळ यांची मुलाखत पाहिली. त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं. पहाटेचा आणि 2 जुलैचा शपथविधी पवारांना अंधारात ठेवून झाल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. शरद पवारांना न सांगता या दोन्ही गोष्टी केल्या आहेत. पवारांना माहीत नव्हत्या. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही दोन्ही निर्णय अंधारात ठेवून घेतल्याचं भुजबळ यांनीच कबुल केलं आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
दूध का दूध पानी का पानी
भाजपशी चर्चा झाली. पण निर्णय कधीच झाला नाही, असं भुजबळ सांगत आहेत. याचा अर्थ पवारांनी त्यांच्या विचारधारेला कधीच सोडलं नाही. त्यावर ते ठाम राहिले. काँग्रेसचा विचार सोडणार नाही यावर ते ठाम होते. चार वेळा भुजबळांनी एकच गोष्ट सांगितली. शरद पवारांकडे जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा पवार म्हणाले, मी येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही भाजपसोबत जा. मी जाणार नाही. पवारांनी काय सांगितलं? तुम्ही जाऊ शकता. मी जाणार नाही. याचा अर्थ विचारधारेशी 60 वर्ष कोण ठाम राहिले? हे भुजबळच सांगत होते. आता भुजबळ बोलल्यानेच दूध का दूध आणि पानी का पानी झालं ना? असंही त्या म्हणाल्या.
भाजपने माफी मागावी
भाजपशी चर्चा केली असं भुजबळ म्हणतात. एकीकडे भाजप राष्ट्रवादीला नैसर्गिक करप्ट पार्टी म्हणते. दुसरीकडे भुजबळ म्हणतात भाजपसोबत गुप्त बैठका सुरू होत्या. आम्ही करप्ट होतो तर भाजप तडजोडीला आमच्यासोबत बसली कशी? म्हणजे भाजप आमच्यावर खोटे आरोप करत होती. आरोप खोटे होते तर भाजपने राष्ट्रवादीची माफी मागितली पाहिजे. भाजपने दुतोंडीपणावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असं आव्हानाच त्यांनी दिलं.