पुणे शहरात मद्य तस्कारांनी दारु वाहतुकीसाठी शोधली अनोखी शक्कल, पण अधिकारी निघाले त्यांचे बाप
liquor : पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांवर ही कारवाई केली आहे. हे तस्कर तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढवत होते. परंतु अधिकारीही त्यांचे बाप निघाले. आरोपींना पकडण्यासाठी जाळे टाकले अन् ते अडकले.
अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील प्रत्येक गोष्टींकडे राज्याच्या नाही तर देशाच्या नजरा असतात. पुणेकरांच्या आवडीनिवडीपासून पुणेरी पाट्यांपर्यंत सर्वच गोष्टी चांगल्या व्हायरल होत असतात. यामुळेच पुणे शहरातील खाद्य संस्कृती प्रमाणे पुणेकरांना कोणते पेय अन् मद्य आवडते याची चर्चा होते. नुकतेच पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील मद्य विक्रीतून मिळालेला महसूल जाहीर केला होता. राज्याला २२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल पुणे विभागाने दिला होता. परंतु त्यानंतर अवैध मद्य वाहतूक मोठ्या प्रमाणवर पुण्यात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी अनोखी शक्कल मद्य तस्करांनी लढवली.
असे आले जाळ्यात
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 57 लाखांचा मुद्देमाल व मद्य साठा जप्त केला आहे. ही अवैध मद्य वाहतूक औषधांच्या नावाखाली केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळाली. मग त्यांनी या तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला. या सापळ्यात ते तस्कर अडकले. अवैध मद्याची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्यांकडून 57 लाखाचा मुद्देमाल व मद्य जप्त केला आहे.
७८ कोटींचा मुद्देमाल वर्षभरात जप्त
अवैधरित्या मद्य विक्री तसेच परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्ह्यांमध्ये ७८ कोटी ७२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी २९४७ जणांवर अवैधरित्या मद्य विक्री केली गेली आहे. तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली. गोव्यातून सीमा शुल्क चुकवून मद्य तस्करी करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहिमेअंतर्गत ४२ लोकांवर कारवाई करण्यात आली.
देशी मद्य, विदेशी मद्याची विक्री वाढली
गेल्या १ वर्षात देशी मद्याच्या विक्रीत १५ टक्के वाढ तर विदेशी मद्य विक्रीत देखील २३ टक्के वाढ झाली. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने १ वर्षात मद्य विक्रीच्या माध्यमातून राज्याला दिला २२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे. मागच्या दोन वर्षातील सगळ्यात जास्त बियरची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात मद्यशौकीनांची बियरला पसंती असल्याचे दिसून येत आहे.
औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द
पुणे विभागातील 107 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. औषधांच्या विक्री प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने 107 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच 442 औषधी विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. एफडीएकडून पुणे विभागात नवीन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने गेल्या वर्षभरात पुणे विभागातील अनेक ठिकाणावर छापे टाकून कारवाई केली आहे.