pune income tax raid | पुणे शहरात आयकर विभागाची छापेमारी, कोण आले रडारवर
pune income tax raid | पुणे शहरात आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचे पथक पुण्यातील बाणेर हडपसर भागात पोहचले. त्यानंतर एक ज्वेलर्सवर आणि त्याच्या निवासस्थानावर छापेमारी सुरु केली.
अभिजित पोते, पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात पुन्हा एकदा आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. पुणे शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या शोरुमवर आणि ज्वेलर्सच्या संचालकाच्या निवासस्थानी आयकर विभागाने तपासणी सुरु केली आहे. गुरुवारी सकाळी ४० वाहनांमधून आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली. या तपासणीसत्राची बातमी शहरात पोहचली अन् त्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे शहरातील हडपसर, मगरपट्टा, बाणेर या भागांत ही छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाचा मोठा फौजफाटा तपासणीसाठी आला आहे.
कोणाकडे सुरु झाली तपासणी
आयकर विभागाचे पथक पुणे येथील निळकंठ ज्वेलर्सकडे तपासणी करत आहे. पुणे येथील पत्र्या मारुती चौक येथील त्यांच्या सराफी दालनावर आयकर विभागाचे अधिकारी विविध वाहनांमधून दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सकाळी सहापासून तपासणी सुरु केली आहे. पथकात आयकर विभागाचे ५० पेक्षा जास्त अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांनी ज्वेलर्सच्या शोरुमची तपासणी सुरु केली आहे. आयकर विभागाची ही झडाझडती पुण्यातील हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील होते आहे.
निळकंठ ज्वेलर्सच्या सर्व शाखांवर तपासणी
पुणे शहरात निळकंठ ज्वेलर्सच्या दहा शाखा आहेत. या सर्व शाखांवर आयकर विभागाने तपासणी सुरु केली आहे. तसेच शोरुमच्या संचालकाच्या निवासस्थानीही पथक पोहचले आहे. आयकर विभागाच्या पथकाची विभागनी चार टीममध्ये करण्यात आली असून त्यांनी एकाच वेळी विविध ठिकाणी तपासणी सुरु केली आहे. पुणे शहरात निळकंठ ज्वेलर्सवर ही छापेमारी का सुरु आहे? याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु ही तपासणी दिवसभर किंवा त्यानंतरही चालणार असल्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या ४० वाहनातून आलेले ५० पेक्षा जास्त अधिकारी तपासणी करत आहेत.
यापूर्वी बांधकाम व्यावसायिकांची तपासणी
आयकर विभागाने मे महिन्यात पुणे येथील बांधकाम व्यावसायिकांची तपासणी केली होती. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाने ही छापेमारी केली होती. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांकडे तपासणी करण्यात आली होती.