पुण्यात सिटी कॉर्पोरेशनच्या चेअरमनकडे आयकर विभागाचे छापे, आठ ठिकाणी पोहचले अधिकारी
पुणे शहरातील आठ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे : मुंबई आणि दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आता पुणे शहरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. पुण्यातील उद्योजक असलेले सिटी कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे बुधवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली आहे. शहरातील आठ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. देशपांडे यांचे राज्यातील बड्या राजकाराण्यांशी निकटचे संबंध आहेत.
bbc वर आयकर विभागाने मंगळवारी छापे टाकले. त्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेने सरकारवर टीका केली आहे. देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे शहरात आयकरचे छापे टाकले आहे. गेल्या ६ ते ७ तासांपासून आयकर विभागचे आधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. आयकर विभागाकडून अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी छापे टाकले गेले आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत.देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे.सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एका आघाडीचा समूह आहे.
कोण आहेत देशपांडे
सिटी कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत. यांचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं चर्चा आहे.