‘त्या’ बॅनरबाजीवरील टीका जिव्हारी, जगदीश मुळीक यांचा आव्हाड यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं…
वाढदिवसाच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुळीक यांच्या बॅनर्सवर भाववी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला होता. त्यावरून ही टीका करण्यात आली आहे.
पुणे : भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स शहरात ठिकठिकाणी लावले होते. या बॅनर्सवर मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर जोरदार टीका केली होती. किती बेशरम असावं माणसांनी अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आव्हाड यांची टीका मुळीक यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुळीक यांनी आव्हाड यांना औरंजेबत संबोधत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केल्याचे बॅनर्सही पोस्ट केलं आहे.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन तीन दिवस झाले नाही तोच जगदीश मुळीक यांचा भावी खासदार उल्लेख करणारे बॅनर्स लागल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. त्यानंतर हे बॅनर्स हटवण्यात आले आहेत. आव्हाड यांची टीका जिव्हारी लागल्याने मुळीक यांनी त्यांना ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
फोटोची खात्रीही करून घेतलेली नाही
बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली. या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. फेकन्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत! प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे, अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे.
बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. फेकन्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत!प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे pic.twitter.com/2VXKRsQc4W
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) April 1, 2023
निवेदन काय?
जगदीश मुळीक यांनी पुण्यात लावलेलं एक बॅनर्स पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेला निवेदन केलं आहे. माझ्या वाढदिवसादिनी अर्थात 1 एप्रिल रोजी दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता, विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। या लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे 1 एप्रिल रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी याची नोंद घ्यावी. वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले आहेत, असं पोस्टरमध्ये मुळीक यांनी म्हटलं आहे.
आव्हाड काय म्हणाले होते?
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुळीक यांच्यावर खोचक टीका केली होती. 10 दिवसांचे सुतक तर संपू द्या. मग लावा बॅनर. का तुम्ही वाटच बघत होतात… आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.. हाच का तुमचा वेगळेपणा. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजून वाहात आहेत. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार. किती बेशरम असावं माणसाने. आमच्यावर संस्कार आहे अस सांगतात. हे लोकांना सुद्धा आवडत नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली होती.