जेजुरी देवस्थानच्या वादावर प्रथमच विश्वस्तांचे स्पष्टीकरण, आरोपांवर दिले उत्तर
Jejuri Temple Trust dispute : जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या वाद रंगला आहे. विश्वस्त मंडळ निवडीवरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यानंतर या प्रकरणी विश्वस्थांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. आता वादावर पडदा पडणार का? हे पाहावे लागणार आहे.
अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा देवस्थानचा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. विश्वस्त पदाच्या निवडीचा हा वाद चांगलाच पेटला आहे. ग्रामस्थांनी देवस्थान विश्वस्त निवडीला विरोध केला आहे. त्याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच आता जेजुरी गाव बंद करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. यानंतर मंगळवारी विश्वस्तांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. विश्वस्तांनी केलेल्या खुलाश्यानंतर हा वाद मिटणार का? हा प्रश्न कायम आहे.
काय म्हटले विश्वस्थांनी
ग्रामस्थांशी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेतली. नवनिर्वाचित विश्वस्तांवर होणारे आरोप, त्यासोबतच विश्वस्तांच्या निवडी विरोधात सुरू असणारे जेजुरी ग्रामस्थांचं आंदोलन या सर्व विषयावर नव्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिल आहे.
आमच्या सर्व नियुक्त्या घटनेनुसार
आमच्या सगळ्या नियुक्त्या घटनेनुसारच झाल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये काहीही गैर नाही. जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच आमच्या नियुक्त्या झाल्या असल्याचं स्पष्टीकरण यावेळी विश्वस्तांनी दिले आहे. त्यासोबतच नवनियुक्त विश्वस्त हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तसेच धर्मदाय आयुक्तांकडे आम्ही कुठलीही शिफारस केली नाही, आंदोलन करणाऱ्यांपैकी काही व्यक्ती खोटी अफवा पसरवत आहे, आरोप देखील या विश्वस्तांनी केला आहे.
तेरा दिवसांपासून आंदोलन
गेल्या तेरा दिवसापासून जेजुरी गावामध्ये ग्रामस्थांनी नव्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलन सुरू केले आहे. ही निवड बेकायदेशीर आहे. बाहेरचे लोक विश्वस्त पदावर घेतले आहेत, असा आरोप करत सर्व ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी सहधर्मदाय आयुक्तांनी कोणते निकष लावले, असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी या निवडीला विरोध केला आहे.
नवे विश्वस्त कोण?
- अभिजीत अरविंद देवकाते (बारामती)
- राजेंद्र बबन खेडेकर (कोथरूड)
- मंगेश अशोक घोणे (जेजुरी)
- विश्वास गोविंद पानसे (बारामती)
- अनिल रावसाहेब सौदाडे
- पांडुरंग ज्योतिबा थोरवे (बालेवाडी)
- पोपट सदाशिव खोमणे (जेजुरी)