Pune crime : दारूचा ग्लास सांडला म्हणून मित्राची हत्या करून मृतदेह फेकला कचऱ्यात, हिंजवडी पोलिसांना दोघांना केली अटक
बालाजीची हत्या करून त्याचा मृतदेह हा कचऱ्याच्या गाडीतून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून दिला. मृत बालाजी हा नांदेडचा रहिवासी असून सध्या तो झाडू मारण्याचे काम करत होता.
पिंपरी चिंचवड : दारूच्या कारणावरून एकाची हत्या (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी भागात दारूचा ग्लास सांडला म्हणून काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण करून एकाची हत्या करण्यात आली. या मारहाणीत बालाजी नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोघांना हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi police) अटक केली आहे. मृत बालाजी, निलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात हे तिघे कंट्री बारच्या मागील बाजूस दारू पिण्यासाठी बसले होते. निलेश आणि बालाजी दारू पिताना बालाजीकडून निलेश याचा दारूचा ग्लास सांडला म्हणून निलेशने काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण (Beating liquor bottle) करून बालाजीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
शवविच्छेदनात डोक्याला मार लागल्याचे स्पष्ट
बालाजीची हत्या करून त्याचा मृतदेह हा कचऱ्याच्या गाडीतून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून दिला. मृत बालाजी हा नांदेडचा रहिवासी असून सध्या तो झाडू मारण्याचे काम करत होता. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याविषयी माहिती दिली, ते म्हणाले, की 15 जुलैला संध्याकाळी माण-महाळुंगे येथे रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. त्याची ओळख पटलेली नव्हती. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात त्याच्या डोक्यावर वार करून खून केल्याचे उघड झाले.
तपासासाठी दोन पथके
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. कचरा टाकणाऱ्या गाडीची ओळख पटवून याचा चालक राजेंद्र याला अटक केली. तर कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कचऱ्यासह बालाजीचा मृतदेह गाडीत भरला होता. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक बंडू मारणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.