पक्षाध्यक्ष हरले, बंडखोर जिंकले; ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची कुणावर मात?
बारामतीत अजितदादा पवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. अजितदादांनी त्यांचं गाव असलेल्या काटेवाडीचा गडही राखला आहे. काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात आली आहे.
पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायातींचा निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर सरशी केली आहे. तीन पक्षांनी तीन पक्षांच्या आघाडीला हरवण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. तसेच राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांना मतदार धडा शिकवेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण प्रत्यक्ष निकालात बंडखोरांनीच मूळ पक्षाध्यक्षांना धूळ चारल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना धोबीपछाड केल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे राज्यातील जनता अजितदादांना पसंती देते की शरद पवार यांच्या पारड्यात मत टाकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शरद पवार यांना राज्यातील जनता साथ देईल असं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्ष निकालातून वेगळंच चित्र समोर आलं आहे. 2 हजार 359 ग्रामपंचायतींपैकी 2205 ग्रामपंचायतींचे निकाल आले आहेत. या निकालात अजितदादा गटाने 406 जागा जिंकल्या आहेत. तर शरद पवार गटाला फक्त 185 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अजितदादा गटाने शरद पवार गटावर मात केल्याचं या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. तसेच जनतेनेही अजितदादा यांच्या राजकारणाला पोचपावती दिल्याचंही अधोरेखित झालं आहे.
शिंदेंकडून ठाकरेंना मात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही उद्धव ठाकरे यांच्या गटावर मात केली आहे. शिंदे गटाला आतापर्यंत 247 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे गटाला फक्त 113 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा दुप्पट जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत ठाकरे गट सहाव्या क्रमांकावर तर शिंदे गट पाचव्या क्रमांकावर गेला आहे. म्हणजेच या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या बंडखोर नेत्यांनी त्यांच्या पूर्वीच्या पक्षाध्यक्षांना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर मात केली आहे.
बारामती दादाचीच
दरम्यान, बारामतीत अजितदादा पवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. अजितदादांनी त्यांचं गाव असलेल्या काटेवाडीचा गडही राखला आहे. काटेवाडी ग्रामपंचायत पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात आली आहे. अजित पवार पुरस्कृत जय भवानी माता पॅनल काटेवाडीत विजयी झालं आहे. विशेष म्हणजे काटेवाडीत भाजपने अजित पवारांच्या विरोधात पॅनल दिलं होतं. तरीही अजितदादा गटाने मोठा विजय मिळवला आहे.बारामती तालुक्यात आतापर्यंत 26 पैकी 24 जागी राष्ट्रवादीचा सरपंच तर 2 जागी भाजपचा सरपंच झाला आहे.