कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं?
पुणे जिल्हा सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीतील सात पैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.
पुणे: पुणे जिल्हा सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीतील सात पैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अजितदादांचं वर्चस्व राहिलं असलं तरी एक जागा गमावल्याचं त्यांना शल्य बोचत आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना पराभूत करण्याचं आवाहन पवार यांनी केलं होतं. त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पण तरीही कंद यांनी लिलया विजय मिळवून अजितदादांचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यामुळे प्रदीप कंद अचानक चर्चेत आले आहेत. कोण आहेत प्रदीप कंद? त्यांच्या विषयीचा घेतलेला हा आढावा.
निवडणुकीत काय घडलं?
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र या जागेवर सुरेश घुलेंचा 14 मतांनी पराभव झाला.
पहिली प्रतिक्रिया….
सर्व पक्षांनी केलेल्या मदतीमुळे माझा विजय शक्य झाला. अजित पवार यांना मला बोलण्याचा अधिकार आहे. मतं फुटली. पण कोणती फुटली हे सांगणं योग्य नाही, अशी सूचक प्रतिक्रिया कंद यांनी व्यक्त केली.
कोण आहेत प्रदीप कंद?
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आजारपणात फडणवीसांची साथ
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कंद यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून पुना हॉस्पिटल आणि नंतर मुंबईच्या लिलावतीत दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज त्यांच्या उपचाराचा आढावा घेत होते. फडणवीस रोज लिलावतीत फोन करून त्यांच्या आजारपणाची माहिती घेत होते. स्वत: कंद यांनी आपला हा अनुभव सांगितला होता.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/7JwexyS5J0#BreakingNews | #LiveUpdates | #Corona | #Omicron |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या: