कोयता बाळगल्यास आता खैर नाही, कोयता गँगसंदर्भात पुणे पोलिसांना मिळाले मोठे यश
पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. तसेच कोयता घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले. कोयता बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत (Terror) कमी होत नाहीय. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. दोन दिवसांपुर्वी प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले. त्यात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Attack on Student) करण्यात आला आहे. आता पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. तसेच कोयता घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले. कोयता बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.
पुणे शहरातील मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीर रित्या कोयते बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले आहे. या सर्वांवर मार्केट यार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा ( वय ३५), गणेशसिंग हुमनसिंग टाक ( वय ३२) अशी अटक करण्यात केली आहे. या दोघांकडून 18 कोयते आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
कोयता खरेदी-विक्रीसाठी आधारकार्ड बंधनकारक
कोयता गँग म्हणजे चर्चेचा विषय झाला आहे. टवाळखोरांसहित गुंडांच्या मध्ये हातात कोयता घेऊन फिरणे एक प्रकारची पॅशनच सुरू झाली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये कोयता वापर सर्रासपणे केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोयता खरेदी विक्रीसाठी नियम लागू केला आहे. कोयता खरेदी करतांना आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे. दुकानदाराला त्याबाबतची नोंद ठेवावी लागणार आहे.
पुणे पोलिसांचे असं असेल नियंत्रण
कोयता खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड दुकानदार घेणार आहे. यामुळे पोलीस कोयता खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याची तपासणी करणार आहे. कोयता खरेदी करण्यामागील कारण काय आहे. त्यामध्ये कुठलाही संशय आल्यास पोलीस थेट कारवाई करणार आहे.
टवाळखोरीला खरोखर आळा बसेल ?
खरंतर पुणे शहरापुरताच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खरेदी करण्याऐवजी ग्रामीण भागात जाऊन टवाळखोर किंवा गुंड कोयता खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे शहरात अटी घालण्यात आल्या असल्या तरी धुमाकूळ घालणाऱ्यांना यानिमित्ताने चाप बसेल की नाही याबद्दल शंका आहे.