Lalit Patil | पुणे पोलिसांना मिळाले ललित पाटील याचे नाशिकमधील आर्थिक कनेक्शन, या व्यक्तीला अटक
Pune Lalit Patil | पुणे शहरातील ससून रुग्णालयातून सुरु झालेले ललित पाटील ड्रग्स प्रकरण धक्कादायक वळणावर आले आहे. या प्रकरणात पोलीस ललित पाटील याचे आर्थिक कनेक्शन शोधून काढत आहेत. त्यात पोलिसांना यश आले आहे.
अभिजित पोते, पुणे | 26 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ललित पाटील प्रकरणात पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरु आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई पोलीस ललित पाटील याच्याशी संबंधित सर्वच पैलू शोधून काढत आहेत. मुंबई पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री नाशिकममधील गिरणा नदीपात्रात टाकलेले कोट्यवधींचे ड्रग्स शोधून काढले. त्यानंतर ललित पाटील याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिला पुणे पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर आता ललित पाटील याचे आर्थिक कनेक्शन शोधले जात आहे. ललित पाटील याच्या आर्थिक कनेक्शन प्रकरणात नाशिकमधील सराफाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
का केली सराफ व्यावसायिकास अटक
ललित पाटील प्रकरणाच्या संदर्भात नाशिकमधील सराफा व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये ही कारवाई केली आहे. ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी या सराफ व्यावसायिकाकडून आठ सोने खरेदी केली केले होते. ललित पाटील याच्याकडून ड्रग्सच्या पैशातून हे सोने खरेदी केले गेले. आता या प्रकरणात आणखी काही सराफ व्यावसायिक पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. ललित पाटील याचे सर्व आर्थिक कनेक्शन आणि गुंतवणूक पोलीस शोधून काढत आहेत.
ललित पाटील याचे मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहार
ड्रग तस्करीच्या पैशातून ललित पाटील याने सोने आणि जमिनीत गुंतवणूक केली आहे. ललित पाटील याच्याकडून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार केले गेले आहे. यामुळे पोलीस ललित पाटील यांच्या गेल्या दहा वर्षांतील मालमत्ता खरेदीची तपासणी करणार आहे. यासाठी पुणे पोलिसांनी राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाला पत्र दिले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाला पत्र लिहित पुणे पोलिसांनी ललित पाटील आणि भूषण पाटील यांच्या जमीन खरेदीचा तपशील मागितला आहे.
चौकशी समितीला मुदतवाढ
ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या प्रकरणी राज्य शासनाने चौकशी समिती नेमली होती. समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. या समितीची मुदत संपली आहे. या समितीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आठ दिवसांची मुदतवाढ दिली गेली आहे.