एखाद्या वाहनाच्या चार्जिंगला चार तास लागले तर इतरांनी झोपा काढायच्या का?; अजितदादांचा सवाल
एखाद्या गाडीला चार्जिंग करायला चार तास लागले तर बाकीच्यांनी काय झोपा काढायच्या का?, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. (Maha Dy CM Ajit Pawar on e-bike policy)
पुणे: महाराष्ट्राने ई-बाईक धोरण राबविले आहे. महाराष्ट्र नेहमीच नव्या गोष्टी राबविण्यात पुढाकार घेत असतो, असं सांगतानाच एखाद्या गाडीला चार्जिंग करायला चार तास लागले तर बाकीच्यांनी काय झोपा काढायच्या का?, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार हे पुण्यात बोलत होते. आता पुढचा जमाना ई-बाईकचा आहे. सायकलचं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र आता सर्वात जास्त दुचाकीचे शहर झालं आहे. आता ई- बाईकचे शहर म्हणून पुणे नावारूपाला आलं तर वावगं वाटायला नको, आणि ते येणारच, असं अजित पवार म्हणाले.
इलेक्ट्रिक बसेस घेण्याचे आदेश
देशभरात डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत. इलेक्ट्रिक्ट पीएमपी बसेस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सीएनजी किंवा इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा आदेश दिलेला आहे. आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. आपलं पुणे प्रदुषण मुक्त झाले तर इतरांची मने जिंकता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहन येत आहेत. प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. लोकं सांगतात कधीतरी इंधनाचा साठा संपणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
पुणेरी ग्राहक चौकस बुद्धीचा
वाहने चालवताना फार स्पीडने जाऊ नका, हात पाय मोडून घेऊ नका. मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, मात्र पुणेकर माहितीय कुणाचं ऐकतोय, असं मिष्किल भाष्य त्यांनी केलं. राज्य सरकार केंद्र सरकारला ई-बाईकला अनुदान देत असते. पुणेरी ग्राहक हा चौकस बुद्धीचा आहे. कितीही प्रश्न विचारेलत तरी शांतपणे त्याच्याशी बोला. लोकांना पटायला थोडा वेळ लागतो. पण एकदा मनात बसले की पसरायला वेळ लागत नाही, असं ते म्हणाले.
पुण्यात 1 कोटी 17 लाख लोकांचं लसीकरण
दरम्यान, अजित पवार यांनी आज सकाळी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने 1 कोटी 17 लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही ते म्हणाले.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 October 2021 https://t.co/KNLUi8p4zU #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021
संबंधित बातम्या:
‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात
मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द, कारण काय?; पुढचा मेळावा कधी?
(Maha Dy CM Ajit Pawar on e-bike policy)