50 हजार कोटी जाहीर करतो, घंटा.. आहेत का तुझ्या हातात?; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधला. कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करतानाच राज यांनी या सदस्यांना एक महत्त्वाची सूचना केली. गाव स्वच्छ ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी या सदस्यांना केलं. गावात आल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे. ओंगळवाणं चित्र दिसता कामा नये, असं सांगतानाच स्वच्छतेमुळे रोगराई दूर होते, असंही ते म्हणाले.
पुणे | 13 जानेवारी 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी 50 हजार कोटी जाहीर करतो. घंटा. काय आहे तुझ्या हातात? उगाच बुडबुडे सोडू नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच मनसेच्या हातात असलेल्या सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांचा निधी बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणाही राज यांनी केली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मनसेच्या हातातील जी ग्रामपंचायत असेल त्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला मी पाच लाखाचा निधी देईल. कमी वाटलं तर जास्त देईन आणि देईनच. यांच्या सारखं नाही. पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50 हजार कोटी देत आहे. घंटा. आहेत का हातात तुझ्या? उगाच बुडबुडे फोडायचे. काय वाटेल ते बोलायचं. जे आवाक्यात असेल ते करा, असं सांगतानाच लोकांचे मतरुपाने जे आशीर्वाद आहेत, ते कायम सोबत ठेवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
एकच सूचना, गाव स्वच्छ ठेवा
तुम्हाला एकच सूचना करायची आहे. तुम्ही प्रामाणिक आहात. मेहनती आहात, याबाबत दुमत नाही. पण एक काम करा. गाव स्वच्छ ठेवा. एवढंच सांगायचं आहे. मागे आपण 16 मिनिटाची एक डॉक्युमेंट्री केली होती. महाराष्ट्राचा विकास आराखडा केला होता तेव्हा मी स्वच्छतेचा विषय आणला होता. आपला परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही. फक्त इच्छाशक्ती लागते. स्वच्छता ठेवल्याने रोगराईपासून मुक्ती होते. गावात राहिल्यावर छान वाटलं पाहिजे, असं गाव स्वच्छ ठेवा, असं आवाहन राज यांनी केलं.
जगण्याची ऊर्मीच जाते
अनेक गावं स्वच्छ आहेत. आपल्या देशातील अनेक स्वच्छ गावे मी पाहिली आहेत. परदेशातही स्वच्छ गावे पाहिली आहेत. मी सक्रिय राजकारणात 1989 पासून आहे. त्यामुळे अनेकदा महाराष्ट्र फिरलो. अगदी उभा-आडवा महाराष्ट्र पाहिला आहे. अनेक गावात गेलो. तालुक्यात गेलो. सगळ्या ठिकाणी स्वच्छतेची वानवा होती. सांडपाणी वाहतंय, तिथेच लहान मुलं फिरतात. त्यातूनच डुकरंही फिरत आहेत. कचरा पडालाय. त्या अस्वच्छ वातावरणामुळे मनही अस्वच्छ होतं. तुम्हालाही वाटतं हे असंच आहे. जगण्याची ऊर्मी असल्या वातावरणामुळे नाहिशी होते, असं राज म्हणाले.