Raj Thackeray : कोणत्या हिंदुत्वावर बोलताय? तुमच्यावर एक तरी केस आहे का?; राज ठाकरेंचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला
Raj Thackeray : परवा उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं काय, नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहेस? तू कोण वल्लभ भाई पटेल? की महात्मा गांधी? मी बोलतोय ना.
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी आजच्या भाषणातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (cm uddhav thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वापासून (hindutva) ते औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे सतत हिंदुत्वावर बोलत असतात. यांचं हिंदुत्व म्हणजे पकपकपक आहे. उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर असेल. एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 1992-93 ला दंगल झाली त्यावरच बोलायचं, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच संभाजी नगरच्या मुद्द्यावर शिवसेना लोकांना झुलवत आहे. त्यामुळे मोदींनी एकदाचं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं. म्हणजे यांचं राजकारणच मोडित निघेल, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांची आज पुण्यात जोरदार सभा झाली. या सभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
परवा उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं काय, नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहेस? तू कोण वल्लभ भाई पटेल? की महात्मा गांधी? मी बोलतोय ना. त्याला काय लॉजिक आहे. इतके वर्ष केंद्रात सत्ता होती. कधी प्रश्न मिटवला का? केवळ निवडणुकीसाठी हा विषय जिवंत ठेवायचं आणि मते मिळवायची. याच गोष्टी यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं तर बोलायचं कशावर? प्रश्नच मिटला. त्यामुळे आता मोदींनीच औरंगाबादचं नामकरण करून यांचं राजकारण संपवावं, असं राज ठाकरे म्हणाले.
काय सालं पोरकटपणा आहे
मुख्यमंत्र्यांच्या बीकेसीच्या सभेवरही त्यांनी टीका केली. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सालं पोरकटपणा आहे कळत नाही. तुमचं खरं हिंदूत्व की आमचं खरं हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे काय वाशिंग पावडर आहे? तुम्हारी कमीज से हमारी कमीज व्हाईट कैसी. लोकांना हिंदुत्वाच रिझल्ट पाहिजे. जे आम्ही देतो. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो, असं त्यांनी सांगितलं.
म्हणून तो राडा झाला
हे जे उत्तर प्रदेशचे बोलत आहेत. जेव्हा आंदोलन झालं होतं. 12 वर्ष झाली. रेल्वे भरती महाराष्ट्रात होती. तिकडून हजारो लोकं रेल्वे स्टेशनवर आली. मी फोटो पाहिला. ते काय आहे. पदाधिकाऱ्यांना सांगितलं जा आणि त्या मुलांशी बोला. कुठून आले? का आले? अशी विचारणा करायला सांगितलं. पदाधिकारी गेले. त्यांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांची विचारपूस केली. त्यावेळी बोलता बोलता बाचाबाचीत आपल्या पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली गेली. त्यानंतर जे प्रकरण सुरू झालं. ते तिथून. प्रकरण सोडा. महाराष्ट्रातील रेल्वे भरती होती. पण महाराष्ट्रातील लोकांना माहीत नव्हतं. महाराष्ट्रातील पेपरला जाहिराती नव्हत्या. पण यूपी, बिहारमध्ये जाहिराती होत्या. त्यावर बोलायचं नाहीय़ उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भरती असेल तर तिथल्या लोकांना नोकरी मिळाली पाहिजे. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. त्यांनी स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील हजारो मुलांना नोकरी मिळाली. हे त्या आंदोलनाचं यश आहे, असं राज म्हणाले.
कोणतं हिंदुत्व बोलता तुम्ही?
हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडवतो. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडल्याचं. टोलनाक्याचं आंदोलन घेतलं. 70 टोलनाके बंद झाले. म्हणजे यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षाची जबाबदारी नाही? टोलवाले लुटतात. त्याचं काहीच नाही. बॉलिवूडमध्ये पाक कलाकार येत होते. त्यांना देशातून हाकलून दिलं. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? रझा अकादमीने पोलीस महिलांवर हात टाकला. त्याविरोधात मनसेने मोर्चा काढला. कोणतं हिंदुत्व बोलता तुम्ही? असा सवाल त्यांनी केला.