Video : अंगात हुडी, डोळ्याला गॉगल; ‘श्रीवल्ली’ गाण्यावर मनसे नेते वसंत मोरे यांचा झक्कास डान्स
मनसेचे नेते वसंत मोरे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या एका डान्समुळे ते चर्चेत आले आहेत. पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली या गाण्यावर वसंत मोरे थिरकताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
पुणे : मनसे नेते वसंत मोरे याना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. कधी पक्षातील नाराजीमुळे नाराज असतात तर कधी एखाद्याला मदत करण्यामुळे चर्चेत असतात. चहाच्या टपरीवर चहा करण्यापासून असो की भटकंतीपर्यंत या ना त्या कारणाने वसंत मोरे नेहमीच चर्चेत असतात. मागे त्यांना धमकी आली होती. त्यामुळेही ते चर्चेत आले होते. यावेळीही ते एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे वसंत मोरे यांचा डान्स. पुष्पा या सिनेमातील श्रीवल्ली गाण्यावर वसंत मोरे यांनी खास पुष्पा स्टाईल डान्स केला. मग काय मोरे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला नसता तर नवलच.
मनसे नेते वसंत मोरे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. पुष्पा या सिनेमातील गाण्यावर डान्स करतानाचा हा वसंत मोरे यांचा व्हिडीओ आहे. एका फार्महाऊसवर अत्यंत फ्रेश मूडमध्ये त्यांनी डान्स केल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये वसंत मोरे यांचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळतोय. अंगात हुडी, डोळ्याला गॉगल, हातात उपरणं घेऊन पुष्पाचा नायक अल्लू अर्जुन प्रमाणे वसंत मोरे नृत्य करताना दिसत आहेत. अवघ्या 14 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. सध्या हा डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. या व्हिडीओला मोरे यांचे चाहते लाइक्स करताना दिसत आहेत.
कोण आहे वसंत मोरे?
वसंत मोरे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. ते कट्टर मनसे सैनिक आहेत. पुण्यातील ते मनसेचे लोकप्रिय नेते आहेत. वसंत मोरे यांच्यामुळेच मनसेची पुण्यात ओळख आहे. मोरे यांचं शिक्षण कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून झालं आहे. नंतर शाहू महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मोरे हे व्यावसायिक आहेत. तसेच शेतकरीही आहेत.
गेल्या 27 वर्षापासून ते राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहेत. 2006मध्ये मनसेची स्थापना झाली. त्यावेळी त्यांनी मनसेत प्रवेश केला. 2007मध्ये त्यांनी पुणे महापालिकेत मनसेचे आठ नगरसेवक निवडून आणले होते. त्यानंतर मोरे यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2012च्या निवडणुकीत पुण्यातून मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत मोरेही विजयी झाले होते. याकाळात महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले. 2017च्या निवडणुकीतही मोरे महापालिकेत निवडून आले.