सरणाची राख निवली नाही तोच…, वसंत मोरे यांचा शिंदे-फडणवीस यांना सवाल; राज ठाकरे यांचीही कोंडी?
कसबा आणि चिंचवडमध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेटवचा दिवस आहे. कसब्यात एकूण 29 जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर चिंचवडमध्ये 33 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुणे: कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किती उमेदवार मैदानात राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मनसेने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या शनिवारी कसबा आणि चिंचवडबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पोटनिवडणुकीवरून सवाल केले आहेत. विधानसभेची निवडणूक होते, मग महापालिकेची का नाही? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. मोरे यांच्या या सवालामुळे भाजपचं टेन्शन वाढलं असून राज ठाकरे यांचीही कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुकपोस्टमधून हा सवाल केला आहे. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे दोन आमदार नुकतेच मयत झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या.
मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. मग तुम्ही पालिका निवडणुका का घेत नाही? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.
तो रणात काय जिंकणार?
पुण्यातील आमदार, खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा. कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार? असा इशाराच वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
भाजपला टेन्शन, राज यांची कोंडी
राज ठाकरे हे उद्या शनिवारी या दोन्ही निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच मनसे नेते वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेत राज्य सरकारला महापालिका निवडणुकीवरून इशारा दिल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे. तर मोरे यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीची डोकेदुखी
दरम्यान, कसबा आणि चिंचवडमध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेटवचा दिवस आहे. कसब्यात एकूण 29 जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर चिंचवडमध्ये 33 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने मविआची अडचण झाली आहे. तर कसब्यात ठाकरे गटाबरोबर युती असूनही संभाजी ब्रिगेडनं उमेदवारी अर्ज भरलाने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपची अडचण
दुसरीकडे कसब्यात टिळक कुटुंबीयांना डावलल्याने टिळक कुटुंबीय नाराज झालं आहे. त्यातच हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने हिंदू मतात फूट पडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कसब्यात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी काय होतं हे पाहावं लागणार आहे.
1400 लिटर दारू जप्त
दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेची जिल्हा प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने या दोन्ही मतदारसंघात जवळपास 1400 लिटर दारू आणि शंभरहून अधिक हत्यारे जप्त केली आहेत.
कसब्यात 184 लिटर दारू तर चिंचवडमध्ये 1200 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक 95 शस्त्र आणि 19 बंदुकीच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूकीत अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी कडक अंमलबजावणी सुरू आहे