Video : मनसे नेते वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?, मोरे यांचं मोठं विधान काय?; भाजपची डोकेदुखी वाढणार?
मी लोकसभा निवडणुकीला उभा राहिलो तर पक्षातील सर्व नेते साथ देतील. आमच्यात मनभेद नाही. मतभेद आहेत. मतभेद हे जिवंतपणाचं लक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिक आणि सर्व पदाधिकारी माझ्या पाठिशी उभे राहतील, असं वसंत मोरे म्हणाले.
पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसनेही ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादीने पुण्यावर दावा सांगितलेला आहे. असं असतानाच आता मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक शंभर टक्के लढेल आणि विजयीही होऊ, असा दावा वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
मला पक्षाने आदेश दिला तर 100 टक्के निवडणूक लढवेल. केवळ लढवणार नाही तर पुणेकरांच्या जोरावर ही निवडणूक 100 टक्के मारेल सुद्धा. मला त्याची खात्री आहे. माझी पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. आता निवडणूक लागेल न लागेल काही सांगता येत नाही. परंतु आताची परिस्थिती पाहिली तर निवडणूक लागण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक लागली आणि राज ठाकरे यांनी आदेश दिले तर पुण्याची लोकसभा लढवेल, असं वसंत मोरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार
पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. इच्छा का नसावी? माणसाने स्वप्न पाहिली पाहिजे. कोरोना काळात मी मोठं काम केलं. त्याची पावती म्हणून पुणेकर मला सहकार्य करतील. म्हणून आमच्या पक्षाला संधी मिळाली तर आरोग्य आणि वाहतूक या विषयावर लढू शकतो. राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली नाही. कारण निवडणूक तळ्यातमळ्यात आहे. पण निवडणूक जाहीर झाली तर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, असं वसंत मोरे म्हणाले.
चमत्कार घडवू शकतो
2017ची पुणे महापालिकेची निवडणूक पाहिली तर मनसेने मध्यमवर्गीय उमेदवार दिले होते. कोणतंही मोठं कार्ड आमच्याकडे नव्हतं. पुण्यातील आमचं संपूर्ण मतदान 3 लाख 79 हजार होतं. या 3 लाख 79 हजार मतांचा ग्राफ पाहिला आणि आजची परिस्थिती पाहिली तर आम्ही जिंकू शकतो, असं मला वाटतं. गिरीश बापट यांना 6 लाख 30 हजार मतदान होतं. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 10 हजार मते मिळाली होती. या सर्व घडामोडी पाहिलं तर आता तुल्यबळ उमेदवार सहा आठ महिन्यासाठी निवडणूक लढवण्याची डेअरिंग करणार नाही. त्यात मतदान किती होईल याची शाश्वती नाही. म्हणून जर मनसे निवडणुकीत उतरली तर आम्ही चमत्कार घडवू शकतो, असा दावाही त्यांनी केला.
गृहखातं काय करतंय?
यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या दंगलीवरून थेट गृहखात्यावर टीका केली. केवळ स्टेट्स ठेवला म्हणून कोल्हापुरात दंगल होत असेल तर आपण कोणत्या दिशेने चाललोय, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. कोणी तरी स्टेट्स ठेवत असेल आणि दंगल होत असेल, आपण लाठ्याकाठ्या घेऊन बाहेर पडत असू तर चुकीचं आहे. पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी जाळपोळ करण्याची गरज नाही. या महिन्यातील दंगली पाहिल्या तर चार पाच शहरात मोठमोठ्या दंगली झाल्या आहेत. गृहखाते काय करतंय? असा सवाल करतानाच आता पोलिसांनी अॅक्शनमोडवर आलं पाहिजे. पोलिसांचं स्लीपर सेल काम करतंय की नाही यावरही प्रश्नचिन्ह उभं राहतंय, असं ते म्हणाले.