MNS Vasant More : मनसेचा पुण्यातला ‘किल्ला’ ढासळणार? वसंत मोरे मुस्लीम कार्यकर्त्यांच्या भेटीला, राजसाहेब बघताय ना?
राजीनामा दिलेल्या मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट वसंत मोरे यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी भाषणात भोंग्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाराज झालेल्या मनसेच्या मुस्लीम शाखाप्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यानंतर वसंत मोरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे.
पुणे : भोंग्यांचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. काल मनसे (MNS) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी मी भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या भोंग्याच्या प्रकरणावरून मनसेच्या मुस्लीम (Muslim) कार्यकर्त्यांनी राजीनामाही दिला होता. आता या राजीनामा दिलेल्या मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट वसंत मोरे यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी भाषणात भोंग्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाराज झालेल्या मनसेच्या मुस्लीम शाखाप्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यानंतर वसंत मोरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. मशिदीवरचे भोंगे उतरवावेच लागतील नाहीतर त्याच्यासमोर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावला जाईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते.
वसंत मोरे काय म्हणाले?
वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. ते म्हणतात, की एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण जेव्हा एखादा शाखा अध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. तेव्हा आज शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, उपशहराध्यक्ष आशिष देवधर, विभागाध्यक्ष गणेश भोकरे महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे उपशहराध्यक्ष अझहर सय्यद, एसटी कामगार शहर अध्यक्ष ललित तिंडे, महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार, शाखाध्यक्ष सलीम सय्यद, मोहसीन शिकालकार, विजय रजपूत, संग्राम तळेकर यांच्यासह भेटून आलो. पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव… जय मनसे…!
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले. राज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.