Pune Porsche crash case: पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता.
पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अखेर हायकोर्टाकडून या प्रकरणी निकाल देण्यात आला. या निकालात अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे कल्याणीनगर अपघात घटनेत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर आज हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका होणार आहे.
या प्रकरणी कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. या प्रकरणी पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात येणार असल्याचं कोर्टानेच स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी अल्पवयीन आरोपीची 33 दिवसांनी बालसुधारगृहातून सुटका होत आहे.
नेमकं काय-काय घडलं?
पुण्यात 18 मे च्या मध्यरात्री आणि 19 मे च्या पहाटेच्या अडीच वाजेच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात अपघाताची घटना घडली होती. एका बड्या उद्योगपतीच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत दोन जणांना चिरडलं होतं. गाडी चालवणारा हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली होती. आरोपीने बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याच्या मित्रांना पबमध्ये पार्टी दिली होती. त्याने मद्यप्राशन केलं होतं. त्याने नशेत महागडी पोर्शे कार भरधाव वेगात कल्याणीनगरच्या रस्त्यांवर चालवली. या दरम्यान त्याने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर अनिस अहुदिया आणि अश्विनी कोष्टा हे दोन तरुण-तरुणी होते. त्यांचा अपघातात जागीच मृ्त्यू झाला होता. या अपघातानंतर तिथल्या स्थानिकांनी अल्पवयीन आरोपीस पकडून मारहाण केली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणी पोलिसांवरही अतिशय गंभीर आरोप झाले होते.
आरोपी अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील ख्यातनाम बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा असल्याची माहिती नंतर समोर आली. या प्रकरणी आरोपीला घटनेच्या अवघ्या काही तासांनी बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन असल्याच्या मुद्द्यावरुन जामीन मिळाला होता. केवळ 300 शब्दांच्या निबंध लेखणाच्या शिक्षेच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणी पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर पोलीस, सरकार यांच्यावरील दबाव वाढला होता. या प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतशा अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होत गेला. पण अखेर या प्रकरणी आता अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला आहे.