पिंपरी चिंचवड : मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरीतील मोशी (Moshi) याठिकाणी हा प्रकार घडला आहे. आश्चर्य म्हणजे या गुन्ह्यातील दहा आरोपींमध्ये चार अल्पवयीन (Minor) आहेत. कृष्णा रेळेकर असे हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पिसे याला पोलिसांनी अटक केली आहे तर इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे. मैत्रीण बोलते या क्षुल्लक कारणावरून या तरुणाचा अक्षरश: दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध घेतला असून एकाला अटक आणि इतरांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शुल्लक कारणांवरून खून करण्याचे प्रकार वाढले असून अशाप्रकारचे गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्र-मैत्रिणीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. संबंधीत मुलगी आपल्या एकाच मित्राकडे पाहते, त्याच्याशी बोलते, याचा इतर मित्रांना राग होता. यावरून या तरुणाचे इतरांनी अपहरण केले. त्याला दगडाने ठेचले आणि त्याची हत्या केली. मंगळवारी हा प्रकार घडला आहे.
मंगळवारी कृष्णाचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शोध घेत आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत दहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी चारजण अल्पवयीन आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.