हो, ‘डबलगेम’च? देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांचा नवा बॉम्ब
"राष्ट्रवादी भाजपला बाहेरुन पाठिंबा देईल हे मी जाहीर सांगितलं होतं. मी दोन दिवसात निर्णय बदलला तर यांनी शपथ का घेतली? माझा पाठींबा होता तर दोन दिवसात सरकार कसं गेलं?", असा सवाल शरद पवार यांनी यावेळी केला.
पुणे : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठमोठे दावे केले. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना शरद पवार यांनी आमच्यासोबत डबलगेम केला असं म्हटलं होतं. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी पाठ फिरवत डबलगेम केला, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली. आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे त्यावेळी पवार-फडणवीस यांच्या भेटीगाठी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय. त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांचं नेमकं स्पष्टीकरण काय?
“आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं. “देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे”, असंही पवार यावेळी म्हणाले.
‘गुगलीवर फडणवीसांची विकेट पडली’
“हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.